Shashi Tharoor on Operation Sindoor: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळमधील खासदार शशी थरूर यांना सध्या पक्षाअंतर्गत टीकेचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही काळापासून शशी थरूर यांच्याकडून सरकारची पाठराखण करणारी विधाने केली जात आहेत. त्यातच पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबतही शशी थरूर यांनी सरकारची बाजू घेतली होती. यानंतर बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत यावर वादळी चर्चा झाली. अनेक नेत्यांनी शशी थरूर यांची विधाने पक्षाशी विसंगत असल्याचा आरोप केला. यावर आता शशी थरूर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
बुधवारी (१४ मे) झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत शशी थरूर यांच्या ताज्या विधानावर चर्चा झाली. काँग्रेसच्या काही नेत्यांनी थरूर लक्ष्मण रेषा मोडत असल्याची तिखट प्रतिक्रिया दिल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख यांनी शशी थरूर यांच्या विधानांचे कौतुक करत काँग्रेसमधील एकमेव नेता भारताबरोबर उभा असल्याचे म्हटले.
काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना बैठकीनंतर माध्यमांनी थरूर यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला. भारत आणि पाकिस्तानच्या विषयात अमेरिकेची मध्यस्थता आम्हाला नकोय, असे विधान शशी थरूर यांनी केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना जयराम रमेश म्हणाले की, थरूर यांचे ते वैयक्तिक विधान होते. जेव्हा थरूर साहेब बोलतात, तेव्हा ते पक्षाचे मत नसते.
शशी थरूर काय म्हणाले?
यानंतर आज शशी थरूर म्हणाले की, मी पक्षाचा किंवा केंद्र सरकारचा प्रवक्ता नाही. आज जेव्हा संघर्षाचा काळ सुरू आहे. तेव्हा भारतीय नागरिक म्हणून मी माझे मत व्यक्त केले. मी कधीही इतर कुणाच्या वतीने बोलण्याचा आव आणला नाही. मी जे काही बोललो, त्याच्याशी तुम्ही सहमत किंवा असहमत असू शकता. यासाठी मला वैयक्तिक दोष दिला तरी काही हरकत नाही.
पहलगामचा हल्ला झाल्यानंतर सरकारने ज्यापद्धतीने परिस्थिती हाताळली त्याबद्दल शशी थरूर यांनी सरकारची पाठराखण केली होती. तसेच पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचे थरूर यांनी समर्थन केले होते. थरूर यांनी दिलेले समर्थन काँग्रेसमधील काही नेत्यांना रुचले नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
भारताने केलेल्या लष्करी कारवाईबाबत काँग्रेसने सावध भूमिका घेतलेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम घडवून आणण्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर काँग्रेसने या विषयावर आपला टीकेचा रोख ठेवला होता. तथापि थरूर यांनी मात्र ट्रम्प यांचा दावा खोडून लावला होता. तसेच भारताने शस्त्रविरामाचा निर्णय विचारपूर्वक घेतला असल्याचे म्हटले.