Shashi Tharoor meet Rahul Gandhi : गेल्या काही महिन्यांपासून खासदार शशी थरूर आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खासदार शशी थरूर हे काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. कारण थरूर यांनी अनेकदा काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शशी थरूर हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही रंगताना पाहायला मिळाल्या.
या सर्व घडामोडी चर्चा सुरू असताना आता शशी थरूर यांनी आज (२९ जानेवारी) रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. शशी थरूर यांनी या भेटीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी जवळपास एक तासापेक्षा जास्तवेळ चर्चा केल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर शशी थरूर यांची पक्षाच्या हायकमांडवरील नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे.
पक्षातील मतभेदाच्या चर्चा फेटाळून लावत पक्षाच्या हायकमांडला भेटण्याच्या आधी शशी थरूर यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. तसेच ‘मी आत्ताच संसदेत जाणार आहे, माझ्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला भेटण्यात चूक काय?’, असं म्हणत आपण पक्षाच्या हायकमांडशी नियमित संवाद ठेवून असल्याचं थरूर यांनी सांगितलं.
वृत्तानुसार, संसद भवनातील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात शशी थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेत विविध विषयांवर जवळपास एक तास चर्चा केली. तसेच या भेटीचे फोटोही शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शशी थरूर यांनी काय म्हटलं?
मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भेटीचे फोटो शशी थरूर यांनी शेअर केले आणि म्हटलं की, “मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याबरोबर विविध मुद्यांवर चर्चा चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. आम्ही सर्वजण देशाच्या सेवेसाठी एकाच विचाराने पुढे जात आहोत”, असं म्हटलं आहे.

