इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि कठीण शब्दसंग्रहासाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना थरूर यांच्याकडून इंग्रजी व्याकरणाची एक छोटीशी चूक झाली. नेटिझन्सच्या ही गोष्ट लगेचच लक्षात आली आणि एका युझरने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर थरूर यांनीही तितक्याच दिलखुलासपणे आपली चूक मान्य केली आहे.
‘On’ ऐवजी लिहिले ‘In’
तिरुवनंतपुरमचे खासदार असलेल्या शशी थरूर यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, ही पोस्ट लिहिताना त्यांनी “on his 76th birthday” या योग्य वाक्याऐवजी “in his 76th birthday” असा उल्लेख केला.
इंग्रजी व्याकरणावर उत्तम पकड असणाऱ्या थरूर यांच्याकडून अशी चूक झाल्याचे पाहून एका ‘X’ युझरने लगेचच कमेंट केली, “शशी जी, तुमच्याकडूनही ग्रामरची चूक झाली! मग ती टायपिंग करताना चुकून का झालेली असेना!”
थरूर यांचे दिलखुलास उत्तर: “अरेरे, असे घडत असते…”
युझरने चूक दाखवून दिल्यानंतर शशी थरूर यांनी कोणताही संकोच न बाळगता दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर दिले. त्यांनी लिहिले, “होय, ‘on’ लिहायच्या ऐवजी ‘in’ झाले. अरेरे, असे अनेकदा घडत असते (This happens all the time alas).” त्यांच्या या प्रामाणिक आणि नम्र उत्तराचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे.
याआधी ‘Drama’ शब्दावरून झाला होता वाद
शशी थरूर यांच्या इंग्रजी शब्दांच्या निवडीवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्याच महिन्यात नेपाळमधील भीषण पूर आणि भूस्खलनाबाबत पोस्ट करताना त्यांनी वापरलेल्या ‘Drama’ या शब्दामुळे मोठा गदारोळ झाला होता.
नेपाळमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीत शेकडो लोकांनी जीव गमावला होता आणि हजारो नागरिक विस्थापित झाले होते. अशा परिस्थितीत काठमांडू येथे पोहोचल्यावर थरूर यांनी लिहिले होते, “टेकऑफ करताना टेकड्यांवर घडलेल्या या ‘नाट्याविषयी’ (Drama) आणि झालेल्या भीषण नुकसानाविषयी मी अनभिज्ञ होतो.”
एवढ्या मोठ्या दुर्घटनेला ‘ड्रामा’ म्हटल्याने नेटिझन्सनी थरूर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. एका युझरने विचारले, “तुम्ही तर शब्दांचे जादूगार आहात, मग तुम्ही अशी शब्दनिवड कशी करू शकता?” तर दुसऱ्याने त्यांना “भारतीय इंग्रजीचे शेक्सपियर” म्हणत या शब्दाच्या औचित्यावर सवाल उपस्थित केला.
थरूर यांनी दिले स्पष्टीकरण
वाद वाढल्यानंतर शशी थरूर यांनी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, ‘Drama’ या शब्दाचा अर्थ केवळ ‘रंगमंचावरील नाटक’ असा होत नाही, तर इंग्रजी शब्दकोशानुसार ‘दोन परस्परविरोधी किंवा तीव्र परिस्थितींची मालिका’ असाही होतो. “मी याच अर्थाने हा शब्द वापरला होता. परंतु, ज्या शब्दाचा सहज चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, असा शब्द वापरल्याबद्दल मला खेद वाटतो,” असे स्पष्टीकरण देत त्यांनी तो वाद शांत केला होता.
