देशात पुन्हा भाजपाची सत्ता आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल असं विधान करणारे काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या विरोधात कोलकाता सत्र न्यायालयाने समन्स बजावले असून त्यांना हजर होण्यास सांगितले आहे. कोलकाता शहरातील वकिल सुमीत चौधरी यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी तक्रारीवरुन कोर्टाने थरुर यांना समन्स बजावले आहे.

चौधरी यांनी थरुर यांच्या विधानाविरोधात बँकशाल कोर्टात गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे. शशी थरुर यांनी हे विधान करुन भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांनी संविधानाचा अपमान केला आहे. धार्मिकतेच्या आधारावर त्यांना समाजात वाद आणि मतभेदांची दरी निर्माण करायची आहे. त्यांनी त्यांच्या विधानाबद्दलही माफी मागायला नकार दिला असे चौधरी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष नासीर उल इस्लाम यांना हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. शरद कुमार सिंह यांनी नासीर उल इस्लाम यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. भारतातील मुस्लिमांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र देशाची मागणी करण्याची गरज आहे असे विधान नासीर उल इस्लाम यांनी केले होते. कोर्टाने थरुर आणि नासीर उल इस्लाम या दोघांना १४ ऑगस्टला हजर होण्यास सांगितले आहे.

काय म्हणाले होते थरुर
भाजपाने २०१९ सालची लोकसभेची निवडणूक जिंकली तर हिंदू पाकिस्तानच्या निर्मितीला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असे विधान शशी थरुर यांनी केले होते. भाजपाने २०१९च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या तर आपल्या लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होईल. संविधानातील सर्व मुलभूत तत्वे काढून टाकण्यात येतील तसेच नवे संविधान निर्मितीचे काम सुरु होईल. त्यामुळे तयार झालेले नवे राष्ट्र हे हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतांवरच चालेल. अल्पसंख्यांकांमधील समानता नष्ट होईल. हे दिवस पाहण्यासाठीच महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद आणि इतर महान नेत्यांना स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला होता का?, असा सवालही त्यांनी विचारला.