केरळ विधानसभेतील ‘वंदे मातरम्’ गायनावरील वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी शासकीय व अधिकृत कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रीय गीताची पाचही कडवी गाण्याच्या सक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. हा प्रकार उपस्थितांसाठी ‘ओझे’ आणि ‘अनावश्यक’ असल्याचे सांगत त्यांनी या सक्तीच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सोमवारी पत्रकारांशी बोलताना शशी थरूर म्हणाले की, राष्ट्रीय गीताचा प्रत्येकालाच आदर आहे आणि जेव्हा ते गायले जाते तेव्हा आपण सर्वजण आदराने उभे राहतो. मात्र, त्याची पाचही कडवी गाणे सक्तीचे करणे योग्य नाही. “राष्ट्रीय गीताचे पहिले किंवा दुसरी दोन कडवी बहुतेकांच्या तोंडपाठ आहेत. सामान्यतः कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गीत एकदाच गाण्याची किंवा वाजवण्याची प्रथा राहिली आहे, तर राष्ट्रगीत स्वतंत्रपणे वाजवले जाते. परंतु आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटीही संपूर्ण पाच कडवी गाण्याचा आग्रह धरला जात आहे, जी एक अनावश्यक सक्ती आहे,” असे थरूर म्हणाले.

पुस्तक प्रकाशनाचा दिला दाखला

आपला अनुभव सांगताना त्यांनी नवी दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा उल्लेख केला, जिथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटीही ‘वंदे मातरम्’ पूर्णपणे गाण्यात आले. थरूर यांच्या मते, इतके मोठे आणि बहुतेकांना पूर्णपणे ठाऊक नसलेले गीत दोनदा गाईले गेल्याने, तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांना जास्त वेळ उभे राहणे कठीण झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् चा जो भाग पूर्वापार गायला जातो, तो राष्ट्रगीताच्या कालावधीइतकाच असतो आणि त्याला जनतेने नेहमीच आदर दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कायद्यात कोणतीही तरतूद नाही

थरूर यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण राष्ट्रीय गीत गाणे बंधनकारक करणारा कोणताही कायदा संसदेत मंजूर झालेला नाही. “हा पूर्णपणे परंपरेचा भाग आहे. कायदा नसल्यामुळे भविष्यात यावर कायदेशीर तोडगा काढावा लागू शकतो,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा राष्ट्रीय गीताला अजिबात विरोध नाही, ते स्वतः आनंदाने हे गीत गाऊ शकतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या उपस्थितीतील अधिकृत समारंभात हे गीत एकदा गाणे समजण्यासारखे आहे, पण एका छोट्या कार्यक्रमात संपूर्ण गीत दोनदा गाण्याचा आग्रह धरणे तर्कहीन आणि वेळेचा अपव्यय करणारे आहे, अशी टीका त्यांनी केली.

वाद कसा सुरू झाला?

२९ मे रोजी केरळ विधानसभेच्या १६ व्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केरळ पोलीस बँडने ‘वंदे मातरम्’ चे संपूर्ण गीत न वाजवता केवळ एक भाग वाजवला होता. यावर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय गीत पूर्ण गायले गेले पाहिजे आणि ते फक्त वाजवण्याऐवजी गायले जावे, असा आग्रह राजभवनाने धरला होता, ज्यानंतर हा वाद निर्माण झाला.