Bihar Assembly Election Results 2025 बिहारमधील राजकीय समीकरणांचा राष्ट्रीय राजकारणावर मोठा परिणाम पाहायला मिळतो. निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून राज्यात एनडीए प्रचंड मोठे बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए बहुमताच्या आकड्यापासून खूप पुढे गेली आहे. दुपारी एक वाजेपर्यंतच्या कलांनुसार, एनडीए १९९ जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडीला (महागठबंधन) केवळ ३८ जागा मिळाल्या आहेत. या निकालावर विविध पक्षांचे नेते आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूरदेखील या निकालावर बोलले आहेत.

थरूर यांचे महत्त्वाचे विधान

“सध्याचा प्रश्न नेतृत्वाचा आहे. ते (एनडीए) बऱ्यापैकी मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. पण निकाल जाहीर करण्यासाठी आपण निवडणूक आयोगाची चर्चा आणि निर्णयाची वाट पाहूया. मला खात्री आहे की पक्षाची (काँग्रेस) ही जबाबदारी आहे की त्यांनी या कारणांचा सखोल अभ्यास करावा. पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. त्यामुळे त्यांनीदेखील त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे काळजीपूर्वक परीक्षण करणे आवश्यक आहे. पण मी एवढे नक्कीच सांगेन की अशा विषयावर आपल्या एकूण कामगिरीकडे पाहणे खूप महत्त्वाचे आहे,” असे थरूर म्हणाले. त्यांच्या मते, निवडणुका अनेक घटकांवर अवलंबून असतात. ते पुढे म्हणाले, “लोकांचा कल, संघटनात्मक शक्ती आणि कमकुवतपणा,असे अनेक मुद्दे पाहावे लागतात. काय चुकले आणि काय बरोबर झाले हे पाहण्यासाठी खूप गोष्टी आहेत. परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण अंतिम निकालांची वाट पाहूया,” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बिहारमधील महिला मतदारांना रोख स्वरूपातील लाभाच्या योजना देण्यात आल्या होत्या. आपल्याला हे चुकीचे वाटत असले तरी, दुर्दैवाने आपल्या कायद्यानुसार ते वैध आहे. राज्यांच्या सरकारांना समाजातील विशिष्ट वर्गाला असे लाभ देताना पाहण्याची ही काही पहिली वेळ नाही. ही गोष्ट असामान्य नाही. मला वाटत नाही की ही एक योग्य पद्धत आहे, परंतु महाराष्ट्रात तसेच यापूर्वी इतर राज्यांमध्येही आपण असेच काहीसे पाहिले आहे. असो, आपण निकालांचे सखोल विश्लेषण करूया. मला वाटते की जे लोक थेट प्रचार मोहिमेत सहभागी होते, ते याचा अधिक सखोल अभ्यास करतील,” असे ते म्हणाले.

राहुल गांधींवर भाजपाची टीका

भारतीय जनता पक्षाकडून विरोधीपक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने होणाऱ्या निवडणुकीतील पराभवाचे प्रतीक बनले आहेत, असा दावा भाजपने केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगावर नागरिकांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधी! आणखी एक निवडणूक, आणखी एक पराभव! जर निवडणुकीतील सातत्यासाठी जर पुरस्कार असते, तर सर्वच पुरस्कार त्यांनाच मिळाले असते. या वेगाने, पराभवांनाही आश्चर्य वाटत असेल की ते इतक्या खात्रीपूर्वक पद्धतीने त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतात,” असे एका भाजपा नेत्याने म्हटले आहे.