Shashi Tharoor On Congress: पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची भूमिका आता भारत जगासमोर मांडणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश भारत जगात पोहोचवणार आहे. यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आलं आहे.

या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची देखील निवड करण्यता आली आहे. मात्र, या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी काँग्रेसने शशी थरूर यांच्या नावाऐवजी दुसऱ्या चार खासदारांची नावे दिली होती. पण तरी देखील केंद्र सरकारने शशी थरूर यांच्या नावाची निवड केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काँग्रेसने तुमचं नाव सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी न दिल्यामुळे पक्ष तुमचा अपमान करत आहे का? असं विचारलं असता शशी थरूर यांनी दिलखुलास उत्तर दिलं.

शशी थरूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मला माझ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवरून शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर मी देखील लगेच होकार दिला. मला यात कोणतंही राजकारण दिसत नाही. माझ्या मते जेव्हा आपलं राष्ट्र असतं तेव्हा राजकारण महत्त्वाचं नसतं”, असं शशी थरूर यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

तसेच काँग्रेसने सुचवलेल्या कोणत्याही नावांबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगत हा पक्ष आणि केंद्र सरकारमधील विषय असल्याचंही शशी थरूर यांनी म्हटलं. तसेच जेव्हा सुरुवातीला मंत्री रिजिजू यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी आमंत्रण देण्याचा फोन मला केला होता तेव्हाच आपण आपल्या पक्षाला याबाबतची माहिती दिली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश भारत जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी काँग्रेसने काही नावे जाहीर केली होती. मात्र, काँग्रेसच्या या यादीत तुमचं नाव नव्हतं. त्यामुळे पक्ष तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न शशी थरूर यांना पत्रकारांनी विचारला असता थरूर म्हणाले की, ‘माझा एवढा सहजपणे अपमान होऊ शकत नाही. मला माझी किंमत माहित आहे.”