Shashi Tharoor on Wayanad Flood : वायनाड येथे मोठ्या प्रमाणात भुस्खलन होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झाला. इथे अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांकडून नुकसानग्रस्तांना मदत केली जात आहे. तसंच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही केरळच्या वायनाडला भेट देऊन मदतीचा हात दिला. दरम्यान, याबाबात सोशल मीडियावर पोस्ट करताना वायनाड दौऱ्याला संस्मरणीय दौरा म्हटल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली. वायनाडला मतद पोहोचवल्यानंतर शशी थरूर (Shashi Tharoor on Wayanad Flood) यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या पोस्टला त्यांनी वायनाडमधील संस्मरणीय दिवसाच्या आठवणी अशी कॅप्शन दिली. त्यांच्या कॅप्शनवरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. माणसं मरत असताना तुम्ही संस्मरणीय आठवणी तयार करत होतात का? असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यांच्या विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. अखेर त्यांच्या संस्मरणीय आठवणीवरून त्यांनी आता खुलासा केला आहे. त्यांनी संस्मरणीय आठवणींची व्याख्याच सांगितली आहे. Some memories of a memorable day in Wayanad pic.twitter.com/h4XEmQo66W— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 3, 2024 "सर्व ट्रोलर्ससाठी- आठवणींची व्याख्या म्हणजे जे कायम स्वरुपी लक्षात राहील किंवा जे कायम स्वरुपी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ते खास किंवा विसरण्यासारखं नसतं. आणि हेच मला म्हणायचं होतं", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. (Shashi Tharoor on Wayanad Flood) For all the trolls: definition of “memorable”: Something that is memorable is worth remembering or likely to be remembered, because it is special or unforgettable. Thats all i meant. https://t.co/63gkYvEohv— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 3, 2024 एएनआयशी बोलताना शशी थरूर यांनी (Shashi Tharoor on Wayanad Flood) सांगितले की, त्यांच्या कार्यालयाने पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी काही गाद्यांची व्यवस्था केली आहे. परंतु या सर्व फक्त तातडीच्या, तात्काळ प्रतिसाद आहेत. आम्हाला दीर्घकालीन दृष्टीनेही विचार करावा लागेल." २१९ लोकांचा मृत्यू, तर अनेकजण बेपत्ता केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात मृतांचा आकडा शनिवारी २१९ वर पोहोचला आहे. यामध्ये ९० महिला, ३० मुलांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली. २१९ मृतांपैकी १५२ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. ५१८ नागरिकांना रुग्णालयात दाखल केले असून, ८९ जणांवर उपचार सुरू आहेत, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, ३० जुलैपासून सुरू झालेले शोध आणि बचाव कार्य अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. हेही वाचा >> Wayanad rescue : या फोटोमागे आहे बचाव पथकाच्या जवानांची अथक मेहनत, चार दिवस अडकून पडलेल्या चिमुरड्यांची गुहेतून सुटका कशी केली? वायनाडमधील भूस्खलनात २०६ नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. शनिवारी सकाळी १३०० जणांच्या बचावपथकाने अवजड यंत्रसामग्री आणि अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. मृतदेहांची ओळख पटवणे अवघड होत आहे. चलियार नदीपात्रातून अनेकांचे अवशेष गोळा करण्यात आले आहेत. ६७ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.