US-Israel-Iran War Updates : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरू आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण हे एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इराणच्या काही प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. तरीही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नसून या युद्धामुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

या युद्धाचा फटका जागातील अनेक देशांना बसत आहे. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. याचा फटका भारतालाही बसत आहे. दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाबाबत भारताची भूमिका काय? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. याबाबत केंद्र सरकारने काही दिवस मौन बाळगल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री एस.जयशंकर यांनी संसदेत निवेदन सादर केलं.

दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचं आता काँग्रेसच्या दोन खासदारांनी समर्थन केलं आहे. काँग्रेसचे नेते खासदार डॉ.शशी थरूर आणि खासदार मनीष तिवारी यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करत महत्वाचं भाष्य केलं आहे.’मौन बाळगणं ही देखील एक रणनीतीच असते’, असं खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे. तसेच ‘मध्यपूर्वेतील युद्ध हे आमचं युद्ध नाही’, असं खासदार मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे.

खासदार डॉ.शशी थरूर काय म्हणाले?

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य करत अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचं कौतुक केलं. केंद्र सरकारचं मौन हा पराभव नसून एक जबाबदार धोरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसमधील एका लेखात शशी थरूर यांनी म्हटलं की, “जे लोक पश्चिम आशियातील युद्धावर सरकारच्या मौनाला भ्याडपणा म्हणत आहेत, त्यांना राजनैतिक राजकारणातील गुंतागुंत समजत नाही. या कठीण काळात सर्व शक्तींसोबत समान संतुलन राखणं आवश्यक असतं. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर कोणीही या युद्धाचं समर्थन करू शकत नाही. हे सार्वभौमत्व आणि शांततापूर्ण निराकरणाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. ज्यासाठी भारत अनेक दशकांपासून उभा आहे. पण परराष्ट्र धोरण हे काही शैक्षणिक चर्चासत्र नाही. त्यामुळे परिणामांची पर्वा न करता केवळ निषेध करण्याचा आग्रह धरणं म्हणजे जबाबदारी टाळून केवळ शाब्दिक वक्तृत्वाचा आनंद घेणं होय”, असं म्हणत खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

खासदार मनीष तिवारी काय म्हणाले?

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाबाबत भाष्य करताना खासदार मनीष तिवारी यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं. ते म्हणाले की, “हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की पश्चिम आशियामध्ये एकच युद्ध सुरू नाही. तिथे अनेक युद्धे सुरू आहेत. इस्रायल आणि इराण यांच्यात जे काही घडत आहे आणि अमेरिका एका बाजूने उभी आहे. हा केवळ मध्य-पूर्वेतील घडामोडींपुरता मर्यादित विषय नाही किंवा हे आमचं युद्ध नाही. आपण नेहमीच मध्य-पूर्वेमध्ये एक गौण भूमिका बजावत आलेलो आहोत. जर आपण मध्य-पूर्वेतील भूमिकेबाबत सावधगिरी बाळगली आहे, तर मला वाटतं की आपण कदाचित योग्य गोष्ट करत आहोत. कारण सामरिक स्वायत्ततेचा खरा अर्थ हाच आहे की आपल्या हितांचं रक्षण करण्याची आणि मार्गक्रमण करण्याची क्षमता”, असं म्हणत खासदार मनीष तिवारी यांनीही केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं.