भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शशी थरुर यांना पाकिस्तानात जाऊन राहण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानमध्ये राहते. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन रहावे. ती त्यांच्यासाठी जास्त योग्य जागा आहे असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. शशी थरुर यांनी अलीकडेच हिंदुत्वाचे तालिबानीकरण सुरु आहे असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सुब्रमण्यम स्वामींनी थरुर यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिलाय.

शशी थरुर यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांना अनेकांनी भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर थरुर यांनी मी त्यांच्यासारखा हिंदू आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? त्यांनी हिंदुत्वाचे तालिबानीकरण सुरु केले आहे असे विधान केले होते.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले कि, तालिबान देश सोडून जाण्यासाठी दबाव टाकतात. आम्ही त्यांच्यावर दबाव टाकत नसून आम्ही फक्त सल्ला देत आहोत. थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानी आहे. त्यामुळे पाकिस्तान त्यांच्यासाठी जास्त योग्य राहिल. तिथे ते जास्त आरामात राहू शकतात. ते स्वत:ला हिंदू म्हणतात पण ते स्वत:हा कधी हिंदू पत्नीसाठी उभे राहिले नाहीत असे स्वामी म्हणाले. थरुर स्वत:च्या पत्नीसाठी उभे राहिले नाहीत त्यामुळे त्यांना हिंदू-मुस्लिम विषयाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. थरुर जी विधाने करतायत त्यामुळे पाकिस्तानचाच जास्त फायदा होतोय असे ते म्हणाले.