संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या निलंबित खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात संसद टीव्हीवर त्या घेत असलेल्या ‘मेरी कहानी’ या शोचे होस्टिंग करण्यास नकार दिला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शशी थरूर यांनी देखील खासदारांच्या निलंबनावर एक निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मोठा निर्णय घेतला.

शशी थरूर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं, “संसदेच्या दोन्ही टीव्ही चॅनल्सचं विलनीकरण करून यावर्षी ऑगस्टपासून सुरू झालेल्या संसद टीव्हीवर ‘टू द पॉईंट’ या शोचं होस्टिंग करणं माझ्यासाठी अभिमानाचं होतं. मी हा शो भारतीय संसदीय लोकशाहीच्या परंपरेचा आदर या भूमिकेतून स्वीकारला. राजकीय मतभेद संसदेचे सदस्य म्हणून आम्हाला एकत्र येण्यापासून अडवू शकत नाही हा त्यामागे विचार होता. मात्र, १२ खासदारांच्या निलंबनानंतर यावर पूनर्विचार करावा लागत आहे.”

“आता संसद टीव्हीवरील माझ्या शोचं होस्टिंग करू शकत नाही”

“संसदीय संस्था ज्या लोकशाही विरोधी पद्धतीने चालवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर निलंबित आंदोलक खासदारांना दररोज सकाळी भेटायला जाऊन पाठिंबा देणारा खासदार म्हणून मी संसद टीव्हीवरील माझ्या ‘टू द पॉईंट’ या शोचं होस्टिंग करू शकत नाही,” असं मत शशी थरूर यांनी सांगितलं.

“संसद टीव्हीचा कॅमेरा विरोधकांना दुर्लक्षून सत्ताधारी बाकांवर”

शशी थरूर पुढे म्हणाले, “संसद टीव्हीवर देखील या प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर केलेल्या टीकेच्या वेळी संसद टीव्हीचा कॅमेरा विरोधकांना दुर्लक्षून सत्ताधारी बाकांवर होता. संसदेचा टीव्हीच्या व्याख्येनुसार या ठिकाणी विविधतेला महत्त्व असायला हवं.”

हेही वाचा : नरेंद्र मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी, कारण…: शशी थरूर

“संसद टीव्हीने संसदेतील वास्तव चित्रण न दाखवता वेगळं चित्र तयार करायला नको. त्यामुळेच आंदोलक खासदारांना पाठिंबा म्हणून जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही आणि संसद टीव्हीचं काम निष्पक्षपणे चालत नाही तोपर्यंत मी माझा संसद टीव्हीवरील कार्यक्रम होस्ट करणार नाही,” असंही थरूर यांनी नमूद केलं.