काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे अनेकदा त्यांच्या इंग्रजीबद्दलच्या प्रेमासाठी चर्चेत असतात. अनेकदा थरुर हे सोशल नेटवर्किंगवर खास करुन ट्विटरवर व्यक्त होताना इंग्रजीमधील असा काही भन्नाट शब्द वापरतात की जो अनेकांनी यापूर्वी पाहिलेला नासतो. त्यांच्या याच वेगळेपणामुळे ते नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. या शिवाय थरुर हे आणखीन एका गोष्टींसाठी चर्चेत असतात ते त्यांच्या महिला सहकारी. अनेक मिम्स पेजेसवर थरुर यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील ते भेटलेल्या महिला सहकाऱ्यांसोबतचे फोटो मजेदार कॅप्शनसहीत व्हायरल होत असतानाच दिसतात. मात्र सध्या थरुर चर्चेत आहेत ते त्यांनी पोस्ट केलेल्या माहिला सहकाऱ्यांसोबतच्या एका फोटोमुळे.
आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थरुर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन सकाळी पावणे बाराच्या सुमारास एक फोटो ट्विट केलाय. या फोटोमध्ये थरुर हे सहा महिला खासदारांसोबत दिसून येत आहेत. फोटोमध्ये सर्वात पुढे उभ्या असलेल्या माहिला खासदारानेच हा सेल्फी फोटो काढलाय. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही दिसत आहेत. सुप्रिया सुळेंसोबतच पतियालाच्या खासदार परनित कौर, खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ, मिमि चक्रवर्ती, ज्योतिमणी आणि डीएमकेच्या खासदार थामीझाची या दिसत आहेत. या सर्वांचे हॅण्डल्स थरुर यांनी टॅग केलेत. मात्र या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन चर्चांना उधाण आलं असून या वरुन दोन गट पडल्याचं दिसत आहे.
थरुर यांनी हा महिला खासदारांसोबतचा सेल्फी शेअर करताना, “कोण म्हणतं की लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाहीय?, माझ्यासोबतच्या सहा महिला सहकारी खासदारांसोबत सकाळी (काढलेला हा फोटो),” अशी कॅप्शन दिलीय.
काहींनी या फोटोवर महिला या काही केवळ सौंदर्यासाठी ओळखल्या जात नाही असा टोला थरुर यांना लगावला आहे. लोक सभेचा कामकाज अधिक आकर्षक होण्यासाठी महिला तिथे नाहीयत. त्या सभागृहाच्या सदस्य आहेत. तुम्ही त्यांचा अपमान करतायत, असा एकीने म्हटलं आहे.
तर इतरांनी थरुर यांनी केलेलं हे ट्विट फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हणत याकडे चुकीच्या अर्थाने पाहू नका असा सल्ला दिल्याचं ट्विटखालील रिप्लायमध्ये दिसून येत आहे.