स्टॅनफोर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये बोलताना काँग्रेस नेते शशी थरूर यांनी विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) मुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालांवर परिणाम झाला असावा, असे मत व्यक्त केले. मतदार यादीतून नावे वगळल्याचा मुद्दा त्यांनी भाजपच्या विजयाच्या फरकाशी जोडला आहे. SIR मुळे मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याने निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला असावा, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमधील ३४ लाख मतदारांचे अपील प्रलंबित

स्टॅनफोर्ड इंडिया कॉन्फरन्स दरम्यान ‘इंडिया, दॅट इज भारत’ या गोलमेज परिषदेत बोलताना थरूर म्हणाले, “एसआयआरच्या (SIR) बाबतीत मी जे म्हटले आहे, तो एक वैध प्रश्न आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून सुमारे ९१ लाख नावे वगळण्यात आली. बंगालचे उदाहरण पाहा; ९१ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली, त्यापैकी ३४ लाख हयात व्यक्तींनी अपील केले आहे की ते जिवंत आहेत आणि त्यांना मतदानाचा कायदेशीर हक्क आहे. नियमांनुसार प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्रपणे निर्णय देणे आवश्यक होते, परंतु मतदानापूर्वी केवळ काही शेकडो प्रकरणांवरच निर्णय देण्यात आले. आजवर असे सुमारे ३१-३२ लाख लोक आहेत, जे निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वैध मतदार असल्याचे आढळू शकतात; परंतु त्यांनी मतदानाची संधी गमावली आहे.”

‘भाजपच्या विजयाचे अंतर प्रलंबित अपीलांच्या संख्येच्या जवळपास’

भाजपच्या सुमारे ३० लाख मतांच्या विजयाचे अंतर हे प्रलंबित मतदार अपीलांच्या संख्येच्या जवळपास असल्याचे निदर्शनास आणून देत थरूर यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. थरूर म्हणाले, “भाजपने बंगाल ३० लाख मतांच्या फरकाने जिंकला. आता तुम्हीच सांगा, हे पूर्णपणे न्याय्य आणि लोकशाहीला धरून आहे का? हाच माझा प्रश्न आहे. खरे सांगायचे तर, बनावट, रद्द केलेले, अनुपस्थित किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यास माझी कोणतीही हरकत नाही.”

केरळमध्ये काँग्रेसला फायदा?

केरळबद्दल बोलताना थरूर म्हणाले की, दुबार मतदार नोंदणी हटवल्यामुळे राज्यात काँग्रेसला मदत झाली असावी. त्यांनी दावा केला की, पूर्वी दुहेरी, तिहेरी आणि एकापेक्षा जास्त मतदार नोंदणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात होती. ते म्हणाले, “केरळमध्ये नावे वगळल्यामुळे काँग्रेसला फायदा झाला असावा अशी मला शंका आहे; कारण सीपीएम दुहेरी, तिहेरी किंवा एकाच व्यक्तीची चार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात वागबगार होती.

“एसआयआरद्वारे (SIR) ही नावे वगळण्यात आली. केरळ आणि तामिळनाडूमध्ये खूप कमी अपीले दाखल झाली, पण बंगालमध्ये ३४ लाख अपीले दाखल झाली होती यात शंका नाही. हे अर्ज ३४ लाख व्यक्तींनी स्वतः भरले होते, तरीही त्यापैकी फक्त काही शेकडो अर्जांवरच सुनावणी झाली आहे”, असं ते म्हणाले. या निवडणुकीत एकट्या केरळमध्ये काँग्रेसने ६३ जागा जिंकल्या आहेत, जी केरळमधील पक्षाची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तर भाजपने ३ जागा जिंकल्या आहेत.