Shatrughan Sinha on BJP entry: तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपमध्ये परतणार की बंडखोरांच्या गटात सामील होणार? या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. “मी ममता बॅनर्जी यांची साथ कधीही सोडणार नाही,” अशा शब्दांत सिन्हांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र त्यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

नेमकं काय घडलं? ‘त्या’ एका पोस्टमुळे चर्चांना उधाण

लोकसभेच्या अध्यक्षांना तृणमूल काँग्रेसमधील नाराज गटाने एक पत्र सोपवले आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याच दरम्यान, सिन्हांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली. मोदी हे देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहणारे नेते ठरल्याबद्दल सिन्हांनी त्यांचे अभिनंदन केले.

“एक खिलाडूवृत्ती दाखवत, आपले मित्र आणि समाजाचे मार्गदर्शक, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो,” असे सिन्हांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनाही टॅग केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील पावलाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.

“दीदींनी कठीण काळात साथ दिली, मी त्यांना सोडणार नाही”

तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखालील नाराज गटात आपण असल्याचा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी पूर्णपणे फेटाळला आहे.

माध्यमांशी बोलताना असनसोलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मी बंडखोर गटात असल्याचा दावा केला जात आहे, पण त्यात काहीही तथ्य नाही. ममता बॅनर्जी यांनी माझ्या कठीण काळात मला खंबीर साथ दिली आहे. आता त्यांच्या कठीण काळात मी त्यांच्यासोबतच उभा राहीन. मी दीदींना कधीही सोडणार नाही.” ममता बॅनर्जी यांच्या आग्रहामुळेच आपण असनसोलमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

शत्रुघ्न सिन्हांचा राजकीय प्रवास

  • भाजपमधून सुरुवात: शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली होती. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम पाहिले. मात्र, नंतरच्या काळात “वैचारिक मतभेद” वाढल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकला.
  • काँग्रेस प्रवेश: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पाटणा साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला.
  • तृणमूलमध्ये एन्ट्री: २०२२ मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर असनसोल लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही ते तृणमूलच्या तिकिटावर मोठ्या बहुमताने विजयी झाले.

पंतप्रधानांचे कौतुक केल्याने सिन्हा पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र “राजकारणात मैत्री वेगळी आणि निष्ठा वेगळी” हे दाखवून देत सिन्हांनी आपण तृणमूलमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.