भाजपमध्ये कोंडमारा होत असलेले पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी, अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लादण्याच्या निर्णयावरून, केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. राष्ट्रपती राजवट लादण्याबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली असती तर आभाळ कोसळले नसते, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘महान सल्लागारांवर’ही टीकास्त्र सोडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर या विरोधात निर्णय दिला तर त्यांच्याकडे त्यावर काय उत्तर आहे, असा सवालही सिन्हा यांनी केला आहे.
प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आपण अधिक सावध असले पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली असती तर आभाळ कोसळले नसते, उलट त्यामुळे आपला जाचापासून आणि वादापासून बचाव झाला असता, असे ते म्हणाले. सिन्हा हे विविध विषयांवरून पक्षनेतृत्वावर सातत्याने टीका करीत असतात, या प्रश्नावर ट्विट केल्यानंतर त्यांनी वरील मत मांडले.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून उत्तम असले तरी त्यांचे सल्लागार त्यांना अनेकदा योग्य सल्ला देत नाहीत आणि त्यामुळे राजकीय खेळी चुकते आणि ते पक्ष आणि सरकारसाठी घातक आहे, असेही सिन्हा म्हणाले.
आपली मते पक्षाने व्यक्त केलेल्या मतांच्या विरोधी आहेत आणि त्याला बंडखोरीचा वास येतो असे विचारले असता सिन्हा म्हणाले की, आपल्याला नेहमीच कुदळ म्हटले जाते, आपली वैयक्तिक मते काही वेळा पक्षाच्या मतांशी अनुरूप नसतात, मात्र आपली मते नेहमीच पक्ष आणि देशाच्या हिताची असतात, असे ते म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा