शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपकडे मागणी
बिहारमध्ये भाजपच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्या पक्षनेत्यांना ‘धडा शिकवण्यात यावा’, असे मत पक्षाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी व्यक्त केले.

निवडणुकीत मिळवलेल्या शानदार यशाबद्दल सिन्हा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. कुमार हे ‘परीक्षित व यशस्वी’ मुख्यमंत्री असून, विरोधी पक्षातील आपल्या मित्रांमध्ये पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यानंतर ते आपल्यासाठी ‘सर्वाधिक आदरणीय’ आहेत, असे उद्गार सिन्हा यांनी काढले.

भाजपच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली नाही, तरीही त्यांना धडा शिकवायला हवा. पराभवाची जबाबदारी निश्चित केली जावी असे पक्षाचे नेते व माजी गृहसचिव आर. के. सिंग यांनी म्हटले असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य विधानसभेच्या प्रचारात शत्रुघ्न सिन्हा यांना दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांनी भाजप नेतृत्वावर, विशेषत: राज्यातील नेत्यांवर टीका केली होती.
नितीश कुमार यांच्यासोबत आपल्या भेटीचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. नितीश कुमार यांना लोकांचा संपूर्ण पाठिंबा आणि त्यांचे प्रेम मिळाले. कायदा व सुव्यवस्था, विकास, सुशासन या सर्व बाबतीत नितीशबाबूंनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याविरुद्ध लोकांची नाराजी नव्हती. अशा शब्दांत सिन्हा यांनी त्यांची प्रशंसा केली.