ज्ञानी सहकाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची वेळ आलीय, शत्रुघ्न सिन्हांचा मोदींना सल्ला

इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. यावरून लक्षात येते की कोणीच कायम अजेय नसतो, असा टोला भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला.

भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा अहेर दिला आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला आहे.

पक्षापासून दुरावलेले भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षावर निशाणा साधला आहे. आता जुन्या आणि ज्ञानी नेत्यांचे (लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा, अरूण शौरी) सहकार्य घेण्याची वेळ आली असल्याचा सल्ला त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान मोदी यांना दिला आहे. मोदींसमोर काही नेते वास्तव घटना आणत नसल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये सिन्हा म्हणाले की, पंतप्रधान सर, तुमचे काही राजकीय आणि सुरक्षा सल्लागार तुम्हाला सध्याच्या राजकीय स्थितीपासून दूर ठेवण्याचे काम करत आहेत. संवाद ज्याचे तुम्ही नेहमी उदाहरण देता, तो जुन्या लोकांपासून करण्याची गरज आहे.

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी ‘छोटू-मोटू’ शब्दाचा वापर करत म्हटले की, सत्य हे प्रत्येक ठिकाणी लिहिलेले आहे आणि सर्वांना ते दिसतही आहे. हे स्पष्ट होत आहे की, छोटू-मोटू आपल्या सन्मानित सहकाऱ्यांच्या आतील दु:ख दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे नाव घेत ते म्हणाले की, आता वेळ आली आहे की पक्षाचे मोठे आणि ज्ञानी लोक, अडवाणीजी, जोशीजी, यशवंतजी आणि अरूण शौरींसारख्यांचा आशीर्वाद घेण्याचा. किर्ती आझादसारख्या सहकाऱ्याची पुन्हा गळा भेट घेण्याची वेळ आली आहे. सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. यावरून लक्षात येते की कोणीच कायम अजेय नसतो, असा टोलाही लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shatrughan sinha give advice to seniors leaders of bjp and pm narendra modi to meet old colleague