…तर नोटबंदीसाठी जनतेनेच जल्लोष केला असता, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपला टोला

शत्रुघ्न सिन्हांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला आत्मस्तुती थांबवण्याचा सल्ला दिला

shatrughan sinha
shatrughan sinha: शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा याप्रकरणी एक ट्विट करत भाजप सरकारला टोला लगावला आहे.
नोटाबंदी आणि जीएसटीवरून भाजपला त्यांचेच काही नेते घेरत असल्याचे दिसत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा याप्रकरणी एक ट्विट करत भाजप सरकारला टोला लगावला आहे. ‘एका पोस्टने मला विचारात टाकले आहे.. जर ‘नोटबंदी’मुळे लोक खूश असते तर जल्लोष सरकार नव्हे तर लोकांनी केला असता..’ हे ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला आत्मस्तुती थांबवण्याचा सल्ला दिला असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, शुक्रवारीच माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी जीएसटीची अंमलबजावणी व्यवस्थित न केल्यामुळे अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचवेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी हे ट्विट केले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या या ट्विटला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केल्याचे दिसून येते. नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी सरकारने ८ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा पैसा विरोधी दिन’ म्हणून साजरा केला होता. तर विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला होता. अनेक ठिकाणी आंदोलनं करत प्रतिकात्मक श्राद्धही घातले होते. तर भाजपकडून नोटाबंदीचे यश लोकांना सांगण्यात आले. देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. हाच धागा पकडून शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर टीका केली. सुरूवातीपासूनच दोन्ही सिन्हा द्वयींनी भाजपवर टीका करण्याचे धोरण अवलंबले आहे.

जयंत सिन्हांसह जय शहाचीही चौकशी करा : यशवंत सिन्हा

दरम्यान, पॅराडाईज पेपरप्रकरणी जर जयंत सिन्हा यांची चौकशी सुरू झाली तर त्याचवेळी जय शहाचीही चौकशी केली जावी. केंद्र सरकारने एका महिन्याच्या आत याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी केली. ज्या नेत्यांची नावे पॅराडाईज पेपरमध्ये आली आहेत. त्यांची सर्वांत आधी म्हणजे एक महिन्याच्या आत चौकशी केली जावी आणि संबंधित राजकीय व्यक्ती दोषी आहे किंवा नाही यांची जनतेला माहिती द्यावी, असे ते म्हणाले. जर जयंत सिन्हा यांची चौकशी करणार असाल तर मग जय शहाची चौकशी का केली जात नाही. त्याला तर न्यायालयात जाऊन खटला दाखल करण्यास सांगितले आहे. सर्वांचीच याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणीही यशवंत सिन्हा यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shatrughan sinha once again criticize bjp government on the issue of note ban demonetization one year celebration

ताज्या बातम्या