अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरलो तरी निवडून येईन, असा ठाम विश्वास भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी व्यक्त केला. याशिवाय इतर पक्षांतून आपल्याला गळ घालण्यात येत असल्याचेही त्यांनी मान्य केले.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपने दूर ठेवले होते. त्यानंतर बिहारमधील भाजपच्या पराभवावर शत्रुघ्न यांनी पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती. पक्ष नेतृत्त्वावर टीका केल्याने शत्रुघ्न यांच्याविरोधात काही भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. शत्रुघ्न यांच्यावर कारवाईची शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. याबाबत शत्रुघ्न यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, मी राजकारणातील सरळ साधा व्यक्ती आहे. इतर राजकीय पक्षांनीही मला पक्षप्रवेशाबाबत अनेकदा विचारणा केली आहे. त्यामुळेच मला कशाचीही चिंता नसल्याचे मी वारंवार बोलत आलो आहे. मी निवडणुकीत मोठ्या फरकाने जिंकून आलो होतो. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तरी मला काहीच अडचण नाही. कारण, मला जनतेचा पाठिंबा आहे. मी नक्की निवडून येईन.
सिन्हा यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत २ लाख ६४ हजार मतांनी विजय प्राप्त केला होता. बिहारमधील पराभवावर मी फक्त माझे मतप्रदर्शन केले होते. पक्ष म्हणून प्रत्येकावर असणाऱया जबाबदारीबाबत जाणीव मी माझ्या ट्विटमधून करून दिली होती. त्यानंतर ते मला पक्षातून काढून टाकणार असल्याच्या चर्चा कानावर आल्या. पण अद्याप तरी त्याबाबत मला पक्षाकडून काहीच सांगण्यात आलेले नाही, असेही शत्रुघ्न पुढे म्हणाले.