बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करून घवघवीत यश मिळवणाऱ्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सोमवारी भाजपचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भेट घेतली. नितीशकुमार यांचे अभिनंदन करण्यासाठीच मी त्यांची भेट घेतली. याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. एकहाती सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. मतदारांनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्याच हातात सत्तेच्या चाव्या देण्याचा कौल दिला आहे. निकालांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी रात्री भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर टीका केली होती. भाजपने निवडणुकीसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला पुढे केले नाही. प्रचार करण्यासाठी मी तारखा दिल्या होत्या. मात्र, मला प्रचारासाठी बोलावण्यातच आले नाही, असा आरोप त्यांनी केला.
सोमवारी दुपारी त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ते म्हणाले, नितीशकुमार यांना मी याआधीही भेटलो आहे आणि यानंतरही भेटत राहीन. त्यांच्याशी आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. या संबंधांना कोणीही राजकारणात तोलू नये. हे माझे वैयक्तिक संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले.