फरिदाबाद या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेमुळे या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. बलात्कार पीडितेच्या बहिणीने आता कॅमेरासमोर येत त्या प्रसंगाची नकोशी आठवण सांगितली आहे.

पीडितेच्या बहिणीने काय सांगितलं?

माझी बहीण खूप उदास झाली होती. तिचा फोन पहाटे ३.३० च्या दरम्यान आला. ती बोलत नव्हतीच, शांत बसली होती. आताही तिची अवस्था वाईट आहे. दोन दिवस रुग्णालायात तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ती घरी परत येण्यासाठी वाट बघत उभी होती. तिला वाटलं की तिला रिक्षा मिळेल. तिने फोनवर हे सांगितलं आणि फोन ठेवला. त्यानंतर पहाटे ३.३० च्या दरम्यान तिचा फोन आला. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. मला आधी वाटलं की रेंज नाही, त्यामुळे मी तिचा फोन ठेवला आणि पुन्हा फोन केला. मी तिच्याशी अर्धा तास बोलत होते, काय झालंय सांग सांगत होते. तिच्या एका मैत्रिणीलाही मी फोन केला आणि तिला फोन करायला सांगितला. तोपर्यंत आम्ही कुटुंबीय ती जिथे होती तिथे गेलो. तिला अशा अवस्थेत पाहून आम्हाला धक्का बसला. आम्ही तातडीने तिला रुग्णालयात घेऊन गेलो. तोपर्यंत तिची शुद्ध हरपली होती अशी माहिती पीडितेच्या बहिणीने एनडीटीव्हीशी बोलताना दिली.

नेमकी घटना काय घडली?

दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. व्हॅनमध्ये लिफ्ट देऊन एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. महिलेवर धावत्या व्हॅनमध्ये दोन ते तीन तास अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिला मध्यरात्री तीन वाजता धावत्या व्हॅनमधून ढकलून दिले. फरीदाबाद येथील २८ वर्षीय विवाहित महिला सोमवारी रात्री घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या दोघांनी महिलेला घरी सोडतो, असे सांगितले. त्यामुळे महिला व्हॅनमध्ये बसली. परंतु, त्यानंतर ती व्हॅन दुसऱ्याच मार्गाने नेण्यात आली. व्हॅनमधील दोघांनी महिलेवर धावत्या व्हॅनमध्ये बलात्कार केला.

दोन ते तीन तास व्हॅमध्ये ती महिला मदतीसाठी ओरडत होती

दोन ते तीन तास व्हॅनमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्यावेळी महिला मदतीसाठी ओरडत होती, परंतु,आरोपी व्हॅन निर्मनुष्य रस्त्यावर चालवत होते. तसेच दिल्लीतील धुक्यामुळे व्हॅनकडे कोणाचे लक्ष गेले नाही. महिलेचा आवाज रस्त्यावर असलेल्या काही मोजक्या लोकांपर्यंत पोहोचला नाही. मध्यरात्री तीनच्या सुमारास नराधमांनी महिलेला धावत्या व्हॅनमधून राजा चौक येथे रस्त्यावर फेकले. महिलेच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. तसेच तिचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. तिच्या चेहऱ्यावर बारा टाके देण्यात आले आहेत.