फरिदाबादमधील एका खासगी शाळेत बुधवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. एका मास्क घातलेल्या हल्लेखोराने शाळेच्या गेटमधून आत प्रवेश केला, एका शिक्षिकेचं नाव विचारलं आणि ती भेटायला बाहेर येताच तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलीस चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या सिक्रोना गावातील एका खासगी शाळेत ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अमित असं या हल्लेखोराचं नाव आहे. आता या प्रकरणी शिक्षिकेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?
२१ वर्षांच्या अमित नावाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. त्याने फरिदाबादच्या खासगी शाळेतील शिक्षिकेवर चाकूचे वार केले. अमित नावाच्या मुलाने दोन महिन्यांपासून तिच्यावर हल्ला करायचं ठरवलं होतं. अखेर त्याने तिच्यावर मंगळवारी हल्ला केला आणि तिला ठार केलं. पोलिसांना दिलेल्या जबाबात अमितने हे सांगितलं की तो तिला ठार करण्यासाठी संधी शोधत होता. संध्याच्या मानेवर आणि छातीवर अमितने २७ वार केले. त्यामुळे संध्या यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अमितला या घटनेनंतर काही तासांमध्येच अटक केली. तो संध्या यांच्यावर वार करुन पळून गेला होता. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत होते.
संध्या यांच्या पतीने काय सांगितलं?
मृत संध्या यांचे पती विकी गुजर यांनी सांगितलं सिरोनी कॉलेजच्या शाळेत संध्या शिकवायला जात होती. तिथेच अमितची आणि तिची भेट झाली होती. एकदा अमितने तिची छेड काढली होती तेव्हा पोलिसांत तक्रार केली होती. त्यावेळी जर पोलिसांनी अमितच्या विरोधात कठोर कारवाई केली असती तर संध्या आज कदाचित जिवंत असती. असं विकी गुजर यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
नेमकी घटना काय?
शाळा प्रशासकाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी एक तरुण शाळेच्या गेटवर आला आणि त्याने संध्या यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा संध्या त्याला भेटण्यासाठी गेटपाशी आल्या, तेव्हा त्या व्यक्तीने चाकूने त्यांच्या चेहरा, मान आणि छातीवर अवघ्या ३० सेकंदात ३० हून अधिक वार केले. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, मास्क घातलेला हा माणूस शाळेत प्रवेश करतो आणि लॉबीमध्ये वाट पाहत थांबतो. शिक्षिका दिसताच तो तिला बाहेर येण्याचा इशारा करतो. ती जवळ येताच तो तिचा गळा पकडतो, तिला ओढत बाहेर नेतो आणि तिच्यावर चाकूने वार करू लागतो. महिला जमिनीवर पडल्यानंतरही तो तिच्यावर वार करत राहिला हे सीसीटीव्हीत कैद झालं आहे. संध्या यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
