Shehbaz Sharif China visit US Iran peace talks: इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता कराराच्या चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अशात आता शांतता चर्चेत मध्यस्थी करत असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे. अमेरिका आणि इराण शांतता चर्चेतील वाटाघाटी बरीच पुढं गेल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. शाहबाज शरीफ यांनी चीन दौऱ्यात हे वक्तव्य केले आहे.
चीन दौऱ्यावर शरीफ
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकताच चीन दौरा केला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ शनिवारी चीनमध्ये दाखल झाले. यावेळी शरीफ यांनी अमेरिका आणि इराण संघर्षावर भाष्य केले. “शांतता चर्चा योग्य दिशेने सुरु आहे”, असे शरीफ यावेळी म्हणाले. ग्रेट हॉल ऑफ पीपल येथे शरीफ बोलत होते. “या भागात लवकरच शांतता नांदू लागेल अशी आशा आहे. बरचं मैदान मारलंय, गोष्टी योग्य दिशेने पुढे जात आहेत”, असे शरीफ म्हणाले.
चार दिवसीय दौऱ्यात विविध चर्चा
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार शरीफ यांनी यावेळी चिनी नेतृत्वाचे आभार मानले. शरीफ चार दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. २३ ते २६ मे या चार दिवसांत शरीफ आणि शी जिनपिंग यांच्यात विविध विषयांवर चर्चा होईल. आर्थिक सहकार्य, द्विपक्षीय संबंध दृढ करणे आणि सीपेक (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. शरीफ यांच्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी चीन दौरा केला आहे.
इराण-अमेरिका शांतता चर्चा
दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी व्यवस्थितपणे सुरु असलेल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी देखील दिले आहे. यावेळी युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत असे सांगितले जात आहे. दुसरीकडे मार्को रुबियो यांनी देखील शांतता करार प्रगतीपथावर असल्याचे भाष्य भारत दौऱ्यात केले. रुबियो यांनी करारबाबात ट्रम्प यांच्यावर विश्वास देखील व्यक्त केला आहे. “सध्या चर्चा सुरु आहे. अनेक गोष्टींवर सविस्तर वाटाघाटी केल्या जात आहेत. सामुद्रधुनी आणि अण्वस्त्र कार्यक्रम देखील चर्चेचा भाग आहेत”, असे रुबियो म्हणाले.
