पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाझ शरीफ यांनी यांनी बिनविरोध निवडून आल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इम्रान खान यांना शनिवारी अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर आता शहबाझ शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होत आहेत. पंतप्रधान पदाच्या निवडणुकीआधीच इम्रान खान यांनी संसद सदस्यपदाचा राजीनामा दिला. आपण चोरांसोबत बसणार नाही, असंही त्यांनी राजीनामा देताना सांगितलं.


इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक ए इन्साफने मतदानावर बहिष्कार टाकला आणि तिथून बाहेर पडले. त्यामुळे शरीफ हे पंतप्रधान म्हणून बिनविरोध निवडून आले. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाने शाह महमूद कुरेशी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उभं केलं होतं. मात्र अधिवेशन सुरू होण्याच्या काही काळ आधीच माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं की पाकिस्तान ए तेहरिकचे सर्व सदस्य संसदेचा राजीनामा देतील आणि परकीय अजेंड्याखाली तयार होणाऱ्या कोणत्याही सरकारचा ते भाग नसतील. इम्रान खान यांनी अमेरिकेने विरोधी पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात मदत केल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भाने चौधरी यांनी हे विधान केलं.


दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान नवे पंतप्रधान शहबाझ शरीफ म्हणाले की परकीय कटकारस्थानाचा इम्रान खान यांचा आरोप खरा ठरला तर आपण घरी परत जाऊ. पाकिस्तान हा दिवस साजरा करेल, असंही ते पुढे म्हणाले. शहबाझ शरीफ आणि त्यांची मुले हामझा आणि सुलेमान हे नोव्हेंबर २०२० मध्ये एका हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणात अडकले होते. त्यापैकी सुलेमान सध्या ब्रिटनमध्ये राहत आहेत. आज पाकिस्तानी न्यायालयाने शहबाझ शरीफ आणि त्यांचा मुलगा हामझा यांच्यावरील आरोप २७ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले आणि त्यांच्या अटकपूर्व जामिनावरही मुदतवाढ दिली. त्यामुळे शरीफ यांना नवे पंतप्रधान बनण्याची परवानगी मिळाली.