किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक या ठिकाणी सध्या शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) शिखर परिषदेत सुरू आहे. या एससीओ शिखर परिषदेला भारत, रशिया, चीन, पाकिस्तानसह आदी देशांचे पंतप्रधान आणि अध्यक्ष उपस्थित आहेत. या परिषदेदरम्यान अनेक जागतिक विषयांवर चर्चा होत आहे. तसेच अनेक देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील पार पडत आहेत.
या एससीओ शिखर परिषदेमधील एका व्हिडीओची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हा व्हिडीओ असून शाहबाज शरीफ हे घाई-घाईने पुढे जाऊन व्लादिमीर पुतिन यांच्या हाताला धरून त्यांच्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
व्हिडीओत काय दिसत आहे? काय घडलं?
एससीओ शिखर परिषदेमध्ये सर्व देशांच्या नेत्यांनी फोटोसेशन केलं. या फोटो सेशननंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पुढे निघून जाताना व्हिडीओत दिसत आहेत, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पाठिमागून घाई-घाईने जाऊन व्लादिमीर पुतिन यांचा हात धरत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.
सर्व देशांच्या नेत्यांचं फोटोसेशन पूर्ण झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन जेव्हा व्यासपीठावरून निघून जाऊ लागले, तेव्हा शाहबाज शरीफ हे त्यांच्या दिशेने गेले आणि त्यांचा हात धरून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यानंतर शाहबाज शरीफ आणि व्लादिमीर पुतिन हे दोघे काही क्षण एकत्र उभे राहिले आणि त्यांनी थोडक्यात संवाद साधला. त्यानंतर ते दोघेही पुढे निघून जाताना व्हिडीओत दिसून आले.
दरम्यान, एससीओ शिखर परिषदेमधील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यावर सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“दहशतवादाच्या परिसंस्थेचा नायनाट करावा लागेल”, मोदींचा थेट इशारा
सर्व प्रकारचे तणाव आणि युद्धे रणांगणावर नव्हे, तर संवादाच्या माध्यमातूनच सोडवली जाऊ शकतात, असं म्हणत दहशतवादासाठी होणारा अर्थपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने या संपूर्ण परिसंस्थेचा आपल्याला नायनाट करावा लागेल, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत केलं. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही उपस्थित होते.
Statement by Prime Minister Narendra Modi during the 26th SCO Summit-
— ANI (@ANI) September 1, 2026
PM Modi says, "It is now time to move these three pillars beyond mere vision and translate them into concrete outcomes. The foremost requirement for this is peace and security. Terrorism remains a grave… pic.twitter.com/4TmoN6wMxl
पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहशतवाद आजही संपूर्ण मानवतेसमोरील एक गंभीर आव्हान आहे. त्याविरोधातील लढाई केवळ ‘कृती आणि प्रतिक्रिये’च्या चौकटीपुरती मर्यादित ठेवता येणार नाही. दहशतवादासाठी होणारा अर्थपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने या संपूर्ण परिसंस्थेचा आपल्याला नायनाट करावा लागेल. या गंभीर विषयावर दुहेरी निकषांना कोणतंही स्थान असू शकत नाही, हे आपल्याला एकमुखाने स्पष्ट करावं लागेल.”
“जे देश दहशतवादाचा वापर आपल्या धोरणाचं साधन म्हणून करतात, तसंच दहशतवाद्यांना आश्रय आणि पाठिंबा देतात, त्यांना कठोर संदेश देणं आवश्यक आहे की, दहशतवाद कोणासाठीही सामरिक साधन ठरू शकत नाही. शांत आणि सुरक्षित युरेशियाची आपली सामायिक आकांक्षा अफगाणिस्तानमधील शांतता आणि स्थैर्याशीही जोडलेली आहे. भारत अफगाणिस्तानच्या जनतेच्या विकासासाठी आणि मानवतावादी मदतीसाठी योगदान देत आला आहे आणि यापुढेही देत राहील”, असंही मोदी म्हणाले.
