Pakistan-Afghanistan Conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. यादमरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी अफगाणिस्तानाला गंभीर इशारा दिला असून पाकिस्तानचे लष्कर आक्रमकांना चिरडून टाकण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील अनेक प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या वेळी हवाई हल्ले केले असून त्यानंतर काही तासांतच त्यांनी हे विधान केले आहे.
“आमच्या सैन्याकडे कोणत्याही आक्रमक महत्त्वाकांक्षा चिरडण्याची पूर्ण क्षमता आहे,” असे पाकिस्तान सरकारच्या एक्स अकाउंटनुसार शरीफ यांनी म्हटले आहे. “संपूर्ण देश पाकिस्तानच्या सशस्त्र दलांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे,” असेही शरीफ म्हणाले आहेत.
अफगाण सैन्याने गुरूवारी पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्यावर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबुल आणि कंदाहार या शहरांवर बॉम्बफेक केली. दोन्ही देशांनी या संघर्षात अनके सैनिक मारले गेले असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.
पाकिस्तानची युद्धाची घोषणा
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आशिफ यांनी तालिबान सरकारच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेली एक्स पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. “आमचा संयम संपला आहे. आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झाले आहे,” असे आसिफ यांनी एक्स वर पोस्ट केले आहे.
पाकिस्तान सरकारचे प्रवक्ते मुशर्रफ जैदी यांनी सांगितले की, १३३ अफगाण तालिबान फायटर्स ठार झाले असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. याबरोबरच २७ लष्करी चौक्या नष्ट करण्यात आल्या असून नऊ चौक्यांवर ताबा मिळवल्याचाही त्यांनी दावा केला आहे.
तर तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी म्हटले आहे की, ५५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून १९ चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच नांगरहारमध्ये ८ तालिबानी फायटर्स मारले गेले आणि ११ जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या संघर्षा १३ नागरिक जखमी झाल्याचेही ते म्हणाले.
पाकिस्तानने नांगरहार आणि पाक्तिका प्रांतात रविवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटला आहे. अफगाणिस्तानामधील युएन मिशनने या हल्ल्यात १३ नागरिक ठार झाल्याचे म्हटले आहे.
नेमका वाद काय आहे?
पाकिस्तानने ताहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यासारख्या पाकिस्तानात हल्ले करणाऱ्या गटांच्या विरोधात कारवाई करण्यात अफगाणिस्तान सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे तालिबान सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान नुकतेच केलेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील स्थिती गंभीर बनली आहे.

