Detailed analysis of Shehbaz Sharif X Post Controversy regarding Pakistan Iran US Conflict update : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवण्याची आणि दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे एका नवीन वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे अमेरिका-इराण संघर्षामध्ये पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

शहबाज शरीफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरोधातील नियोजित लष्करी कारवाई स्थगित करण्याती आणि इराणला दिलेली मुदत वाढवण्याचे आवाहन केले होते. मात्र शरीफ यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे

शहबाज शरीफ यांनी लिहिले होते की, “मुत्सद्देगिरीला वाव देण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अत्यंत कळकळीची विनंती करतो की त्यांनी ही मुदत दोन आठवड्यांसाठी वाढवावी.” त्याचबरोबर शरीफ यांनी इराणलाही सद्भावनेपोटी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानचे मध्यस्थीचे प्रयत्न स्थिर, भक्कम आणि प्रभावीपणे पुढे सरकत आहेत, यावर त्यांनी जोर दिला होता.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला होता. यावेळी अराघची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या विनंतीचा उल्लेख केला आहे.

नेमका विषय काय?

या सगळ्यात शरीफ यांच्या पोस्टच्या ‘एडिट हिस्ट्री’कडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटनुसार, शरीफ यांनी केलेल्या पोस्टच्या पहिल्या आवृत्तीत “ड्राफ्ट-पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा एक्सवरील संदेश (Draft – Pakistan’s PM Message on X)” असे लिहिले होते.

ड्राफ्ट असे लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीमध्ये देखील मध्यपूर्वेतील संघर्ष राजनैतिक मार्गाने सोडवण्यासंबंधी आवाहन करण्यात आले होते. मात्र या पोस्टमध्ये ‘ड्राफ्ट’ असे नमूद करण्यात आलेले होते. यामुळे शरीफ यांनी पोस्ट केलेला हा संदेश आधीच लिहिण्यात आलेला होता का? हा दुसरीकडेच कुठेतरी ड्राफ्ट करण्यात आला होता का? याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत.

Pakistan PM
शरीफ यांनी आधीची आणि नंतरची पोस्ट

मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये, शरीफ हे व्हाईट हाऊसकडून मिळालेल्या सूचना काढायचे विसरल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच हा संदेश आधीच तयार करून त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता जो केवळ पोस्ट करायचा होता, असा आरोप काही वापरकर्त्यांनी केला आहे. काही जणांच्या मते, जर हा इंटर्नल ड्राफ्ट असता, तर त्यात अशा प्रकारच्या औपचारिक लेबलिंगची आवश्यकता नसती.

मात्र या सर्व दाव्यांची अद्याप पुष्टी झालेली नाही. तसेच पाकिस्तान किंवा अमेरिका यांच्याकडून अद्याप या प्रकाराबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्या आलेली नाही.