प्रख्यात शहनाईवादक उस्ताद अली अहमद हुसेन खान यांचे बुधवारी येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते.
भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्यानंतरचे प्रख्यात शहनाईवादक म्हणून अली अहमद हुसेन खान यांचा लौकिक होता. त्यांच्या पश्चात पाच पुत्र, पाच कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
बनारस शहनाई संगीत घराण्याशी संबंधित असलेले अली खान यांना संगीत क्षेत्रातील
उल्लेखनीय कामगिरीबद्दल २००९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. बनारसमध्ये शहनाईवादकांच्या घराण्यात जन्मलेले अली खान यांचे शास्त्रीय आणि निमशास्त्रीय संगीतावर प्रभुत्व होते.
बेल्जियम, फ्रान्स, रशिया, स्वित्र्झलड, टय़ुनिशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, हाँगकाँग आणि फिलिपाइन्स आदी देशांमधील रसिकांनी त्यांच्या सुरांची जादू अनुभवली होती.
पश्चिम बंगाल सरकारने २०१२ मध्ये त्यांचा बंगभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. अली खान यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.