भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना नव्याने पत्र लिहून “तातडीच्या आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थिती”मुळे खासगी क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

शहजाद पूनावाला यांनी गेल्या महिन्यात पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्याऐवजी त्यांना त्यांच्या निर्णयाचा पुन्हा विचार करण्यास सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा पत्र लिहून आपला निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

“आधी सांगितल्याप्रमाणे, तातडीच्या आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे मी खासगी क्षेत्रात जाणार आहे. पण जिथे शक्य असेल आणि ज्या स्वरूपात शक्य असेल, तिथे पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या दृष्टिकोनाला आणि कामाला माझा पाठिंबा कायम राहील,” असे पूनावाला यांनी पत्रात म्हटले आहे.

मोदी, शाह आणि राजनाथ सिंह यांच्याबद्दल आदर व्यक्त

राजीनामा देत असतानाही पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्याबद्दल “सर्वोच्च आदर” असल्याचे पत्रात नमूद केले. पूनावाला हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून दूरचित्रवाणीवरील राजकीय चर्चांमध्ये पक्षाची भूमिका मांडताना दिसत होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा भाजपासाठी चर्चेचा विषय ठरला होता.

३० जुलैला दिला होता पहिला राजीनामा

पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सर्वात प्रथम ३० जुलै रोजी पक्षाकडे पहिला राजीनामा दिला होता. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांनी या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असे सांगितले.

यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील आपल्या प्रोफाइलमधून भाजपाशी संबंधित पदे आणि पक्षाशी असलेली ओळख हटवली होती. त्यांच्या सध्याच्या प्रोफाइलमध्ये “धर्म इस्लाम, संस्कृती – हिंदू, विचारधारा – भारतीय. लेखक: जीएसटी की यात्रा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजीवन अनुयायी”, असे लिहिले आहे

आता नव्या पत्रातून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले असून, खासगी क्षेत्रात जाण्याची तयारी सुरू असल्याचेही संकेत दिले आहेत.