Shehzad Poonawalla: भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. पूनावाला यांना राजीनामा दिल्यानंतर पैशांचे कारण सांगितले होते. पूनावाला यांनी भाजपात नेत्यांना, प्रवक्त्यांना पैसे मिळतात का? याबाबत खुलासा केला आहे. तसेच, भाजपा का सोडली? याबाबत पूनावाला यांनी सविस्तर भाष्य केले आहे. शहजाद पूनावाला यांनी बरखा दत्त यांना मोजो स्टोरीसाठी दिलेल्या मुलाखतीत त्यांची भूमिका मांडली.

भावाच्या व्यावसायात भागीदारी आहे का?

“राजकीय नेत्यांविषयी आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. नेत्यांच्या घरात कोट्यवधी रुपये असतात, त्यांच्याकडे मोठी सुरक्षा व्यवस्था असते आणि त्यांचा मोठ्या घराशी संबंध असतो, मी या कोणत्याही चौकटीत बसत नाही”, असे पूनावाला म्हणाले. राहते घर देखील छोटे असल्याचा खुलासा पूनावाला यांनी बरखा दत्त यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना केला. घरात एक बेडरुम, किचन आणि बाल्कनी असल्याचे पूनावाला सांगतात. भावाच्या व्यावसायातही त्यांची भागीदारी नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाऊ तहसीन पूनावाला यांने स्वत:च्या जीवावर व्यवसाय उभा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बचत केलेले पैसे खर्चासाठी वापरल्याचा दावा

पैसे आणि खर्चाबाबतही पूनावाला यांनी पॉडकास्टमध्ये माहिती आहे. “एकत्र कुटुंबात राहत असताना खर्चाचा भार नव्हता”, असे त्यांनी सांगितले. “काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. या पाच वर्षात मी माध्यमांमध्ये काम केले. या काळात मला साडे तीन ते चार लाख रुपये पगार मिळत होता, हे अधिकृतपणे तपासूनही बघता येईल, असे पूनावाला यांनी सांगितले. लग्न न झाल्यामुळे माझा खर्चही अधिक नाही”, असेही पूनावाला पुढे गंमतीने म्हणाले. “भाजपात येण्यापूर्वी माझ्याकडे बचत केलेले पैसे होते. २०२४ पर्यंत काम करायचे पुन्हा खासगी क्षेत्रात परतण्याचा माझा प्लॅन होता”, असेही त्यांनी पुढे सांगितले.

भाजपा नेत्यांना पैसे देते का?

पूनावाला यांनी पगाराबाबत बोलताना कोणताही पक्ष प्रवक्त्यांना पैसे देत नाही असा खुलासा केला. “भाजपाने कार्यकर्त्यांसाठी, कार्यालयात असणाऱ्या मोठ्या नेत्यांसाठी एक इमारत उभारली आहे. तिथे या नेत्यांना राहण्याची सोय होते.” मध्यम स्वरुपाचे हे कॉर्टर असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. “एखाद्या राज्याचा प्रभारी वारंवार त्या राज्यात दौरा करणारा नेता यांना तिकीटाचे पैसे दिले जातात. मी देखील कार्यक्रमांसाठी जात होतो त्यावेळी माझ्याही तिकीटाचा खर्च भाजपा करायचे”, असे पूनावाला यांनी सांगितले. पण, राजकारणात फिक्स इनकम मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाजपा सोडण्याचे कारण काय?

अमित मालवीय यांच्या नियुक्तीबाबत बोलताना पूनावाला यांनी, “मी पदासाठी काम नाही करत. मी एक ध्येयासाठी काम करत होतो,”असे सांगितले. तसेच, “माझ्याकडे घराचं भाडं द्यायला पैसे नव्हते असा खुलासा केला. तुम्ही खासदार आहात किंवा कुठून तरी पैसे मिळत आहेत किंवा तुमचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही माध्यमांमध्ये काम करताय, मी या तिन्हीमध्ये नाही. भाजपाचा शिक्का असल्याने कोणी माध्यमांमध्ये संधी देणार नाही”, असेही पूनावाला यांनी भाजपा सोडण्याचे कारण सांगताना स्पष्ट केले.

भाजपात नोकरी किंवा रोजगाराच्या संधीसाठी मी नव्हतो असेही पूनावाला यांनी सांगितले. राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांनी संपर्क केल्याचेही त्यांनी सांगितले. खासगी क्षेत्रात पुन्हा गेल्यानंतर मला पैसे मिळतील असेही पूनावाला यांनी सांगितले.