‘बिग बॉस २०’ मधील प्रवेशावरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळण घेताना दिसत आहे. मुंबईतील मॉडेल रिया अहिर आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगले आहे. रियाने पूनावाला यांना ‘अंकल’ म्हणत हिणवल्यानंतर, पूनावाला यांनी राहुल गांधी यांचे नाव घेत प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘जेन झी’ (Gen Z) आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांची व्हॅन थांबवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रिया अहिर प्रकाशझोतात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस २०’च्या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी तिची स्पर्धा पंजाबी अभिनेत्री लव्ह गिल हिच्याशी होती. जनतेच्या मतदानाच्या आधारे लव्ह गिलने बाजी मारली आणि रियाचा बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच पत्ता कट झाला.
रियाच्या या अपयशानंतर शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ (रील) शेअर करत तिच्यावर टीका केली. रियाचा आंदोलनातील तो फोटो एक राजकीय रणनीतीचा भाग होता, असा दावा पूनावाला यांनी केला. “आधी आंदोलनाच्या नावाखाली फोटो व्हायरल करायचा, मग राहुल गांधी, सुप्रिया सुळे, राज ठाकरे आणि डिंपल यादव यांच्यासारख्या नेत्यांचे पाठबळ मिळवून ‘अँटी-मोदी’ अजेंडा बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचवायचा, असा हा सगळा प्लॅन होता,” असा आरोप पूनावाला यांनी केला.
रिया अहिरचा पूनावालांवर पलटवार काय?
पूनावाला यांच्या टीकेला उत्तर देताना रिया अहिरने दोन व्हिडीओ शेअर केले. पूनावाला यांचा उल्लेख ‘अंकल’ असा करत रिया म्हणाली, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि कामात लक्ष घालणं बंद करा. तुमचे वय ३८ आहे आणि माझे २८. तुम्ही माझ्यापेक्षा दुप्पट वयाचे आहात. त्यामुळे तुमच्या वयाच्या पुरुषांसोबत जाऊन राजकारण करा, कमी वयाच्या मुलींच्या पाठीमागे लागू नका.”
यासोबतच, पूनावाला यांनी लावलेले राजकीय आरोप फेटाळून लावत रियाने आपण केलेल्या सामाजिक कामांचे व्हिडीओ प्रसिद्ध केले. “बिग बॉस हा मनोरंजनाचा शो आहे. तिथे कोणताही राजकीय किंवा धार्मिक अजेंडा चालत नाही,” असेही तिने ठणकावून सांगितले.
“तुमचे गणित कच्चं आहे”; पूनावालांचे प्रत्युत्तर काय?
रियाच्या या प्रत्युत्तरानंतर शहजाद पूनावाला यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत तिच्यावर पुन्हा निशाणा साधला. पूनावाला म्हणाले, “बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळण्यापूर्वीच तुम्हाला बाहेर पडावं लागलं, याबद्दल वाईट वाटले. पण ज्या राहुल गांधींना स्वतःची निवडणूक जिंकता येत नाही, ते तुम्हाला कशी मदत करणार, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे होते.”
वयाच्या मुद्द्यावर बोलताना पूनावाला म्हणाले, “तुमचे वय २८ आहे, त्यामुळे तुम्ही काही लहान मुलगी नाही आहात. माझे वय ३८ आहे, त्यामुळे मी तुमच्या दुप्पट वयाचा कसा काय झालो? बहुधा शाळेत तुमचे गणित खूपच कच्चे असावे. तुम्ही कदाचित ५६ वर्षांच्या राहुल गांधींसोबत माझी गल्लत केली असावी.” रिया अहिर ही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे करत असून तिच्या या वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.
