भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अशातच एका विशेष मुलाखतीत त्यांनी काँग्रेसमधील पुनरागमनाच्या सर्व शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.

“भाजपा हाच सर्वोत्तम पक्ष”

एनडीटीव्हीला (NDTV) दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे भरभरून कौतुक केले. “जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम केल्यानंतर मी दुसऱ्या कोणत्याही लहान पक्षात जाईन असे तुम्हाला वाटते का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा महान नेता या देशात झाला नाही आणि होणारही नाही. सद्यस्थितीत भाजप हाच भारतातील सर्वात सर्वोत्तम पक्ष आहे,” असा दावा त्यांनी केला.

‘या’ अटीवर करणार काँग्रेस प्रवेश

“राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना पक्षातून हटवले आणि जवाहरलाल नेहरूंच्या कृतींबद्दल माफी मागितली, तरच मी काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करेन,” अशी उपरोधिक अट त्यांनी घातली आहे.

राजीनाम्यामागे ‘आर्थिक’ कारण?

राजकारणातून बाहेर पडण्याच्या आणि भाजपचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर बोलताना पूनावाला यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडली. “मला माझ्या घराचे भाडे भरावे लागते. मी भाजपचा नेता आहे म्हणून माझा घरमालक मला मोफत राहू देणार नाही. १ तारखेला त्याला भाडे द्यावेच लागते. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना किंवा प्रवक्त्यांना पगार देत नाहीत,” असे सांगत त्यांनी आर्थिक अडचणींमुळेच राजकारण सोडत असल्याचे स्पष्ट केले.

२४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस काम करूनही त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

“मी ना कोणाचा मुलगा, ना भ्रष्टाचार करणारा”

राजकारणातील घराणेशाहीवर टीका करताना पूनावाला म्हणाले की, “सामान्यतः राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात— एक ‘लेता’ (भ्रष्टाचार करून पैसे घेणारे) आणि दुसरे ‘बेटा’ (नेत्यांची मुले). मी या दोन्ही वर्गवारीत बसत नाही. मी पहिल्या पिढीचा राजकीय कार्यकर्ता आहे. सचिन पायलट किंवा इतर घराणेशाहीतील नेत्यांसारखी आमची आलिशान जीवनशैली नसते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी मला खाजगी क्षेत्रात काम शोधणे गरजेचे बनले आहे.”

जुलै अखेरीस पूनावाला यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भाजपशी संबंधित माहिती हटवली होती, ज्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.