Sheikh Hasina Arrest Threat: “भारतामधून परतल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना अटक केली जाईल”, अशी स्पष्ट घोषणा बांगलादेशचे कायदा मंत्री एम. असदुज्जमान यांनी गुरुवारी केली. जिवाला धोका असला तरी डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशात परतणार असल्याचे हसीना यांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यानंतर लगेचच कायदा मंत्र्यांचे वक्तव्य समोर आले आहे. असदुज्जमान यांनी कायद्यानुसार कारवाई होईल असे म्हटले आहे.
कायदा मंत्री एम. असदुज्जमान काय म्हणाले?
“मृत्यूदंडाची शिक्षा भोगत असलेल्या हसीना एक बांगलादेशी नागरिक म्हणून, कायद्याचा आदर करून त्या आत्मसमर्पण करण्यासाठी परत येत असतील, तर कदाचित त्यांना न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच अटक केली जाईल. कायद्याने आम्हाला दिलेल्या अधिकारांचा आम्ही वापर करु,” असे बांगलादेशचे कायदा मंत्री एम. असदुज्जमान पत्रकारांशी बोलताना म्हणाले. “कायद्यानुसार कारवाई होईल, आम्ही कायद्याचे उल्लंघन करून आम्ही काहीही करणार नाही,” असेही मंत्री एम. असदुज्जमान यांनी स्पष्ट केले.
शेख हसीना लवकरच मायदेशी परतणार
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी बांगलादेशात परतणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “माझी हत्या होऊ शकते, मला अटक केली जाऊ शकते, किंवा तुरुंगवासात पाठवले जाऊ शकते… मला माझ्या भविष्याची पूर्ण जाणीव आहे. तरीही मला परत जायचे आहे, कारण माझे लोक मला बोलवत मारत आहेत,” असे हसीना यांनी म्हटले होते. हसीना यांच्याकडील पासपोर्ट अंतरिम सरकारने रद्द केला आहे. याबाबत असदुज्जमान यांना प्रश्न विचारला असता, “ती त्यांची समस्या आहे, माझी नाही,” असे म्हणाले.
आंदोलनादरम्यान हसीना यांचे सरकार पडले
दरम्यान, बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान हसीना यांचे सरकार पडले. यानंतर शेख हसीना भारतात राहत आहेत. एका वर्षाने, विद्यार्थी आंदोलकांवरील दडपशाहीप्रकरणी इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनलने हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच यांसारख्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या कायदेशीर कार्यवाहीत त्रुटी असल्याचे म्हटले आहे, तर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयानेही या खटल्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
