गेल्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच शेख हसीना यांनी दिल्लीत व्हर्च्युअल पद्धतीने सार्वजनिकरीत्या माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेख हसीना यांनी बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या उठावाबाबत आणि मायदेशी परतण्याबाबतच्या निर्णयावर महत्वाचं भाष्य केलं. ‘बांगलादेशात झालेला उठाव हा नियोजित सत्तांतर करण्यासाठीचा कट होता, विद्यार्थ्यांचं आंदोलन नव्हतं’, असा गंभीर आरोपही शेख हसीना यांनी केला.

शेख हसीना यांनी आज (५ ऑगस्ट) नवी दिल्लीतून प्रसारमाध्यमांसमोर आपली व्हर्च्युअल उपस्थिती दर्शवत विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशात परतण्याबद्दलच्या मुद्यावर बोलताना शेख हसीना यांनी म्हटलं की, “या वर्षी डिसेंबरपर्यंत ढाक्याला परण्याचं नियोजन आहे. तिकडे परतल्यावर मला अटक केली जाऊ शकते किंवा कदाचित माझी हत्याही होऊ शकते. मात्र, तरीही, मला जावंच लागेल.”

शेख हसीना काय म्हणाल्या?

“मागील दोन वर्षांत मी माझ्या बांगलादेशाला हाल, अपेष्टा सहन करताना पाहत आहे. हा तो बांगलादेश नाही, जो आम्ही घडवला होता. हा तो बांगलादेश नाही, ज्यासाठी १९७१ मध्ये ३० लाख लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. २०२४ मध्ये जी काही निदर्शने झाली होती, ते विद्यार्थ्यांची निदर्शने नव्हते. सुरुवातीपासून माझ्या सरकारने संवाद आणि संयमाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही काही संघटित गटांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं रूपांतर हिंसक राजकीय हत्यारात केलं. तो एक नियोजित आखलेला कट होता. ज्याचा उद्देश आमचं सरकार सत्तेतून हटवणं हा होता”, असा आरोप शेख हसीना यांनी केला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

‘बांगलादेश भारतासाठी दुसरा पाकिस्तान बनलाय’

“बांगलादेश भारतासाठी आता ‘दुसरा पाकिस्तान’ बनला आहे”, असा आरोप शेख हसीना यांच्या मुलाने यावेळी बोलताना केला आहे. तसेच त्यांनी बांगलादेशातील परदेशी गुप्तचर संस्थांच्या भूमिकेबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

शेख हसीना भावूक

आपल्या कुटुंबाच्या वारशाबाबत बोलताना शेख हसीना भावूक झाल्या. १९७५ मधील हत्येच्या घटनेत मारले गेलेले त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान आणि कुटुंबातील इतर सदस्यांची आठवण काढताना हसीना यांना अश्रू अनावर झाले. “मुजीबुर रहमान यांचं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असं म्हणत शेख हसीना भावूक झाल्या.