“मला माझ्या मायभूमीत परतण्यासाठी कोणत्याही परकीय ताकदीच्या आशीर्वादाची किंवा संरक्षणाची गरज नाही. मृत्यू जर माझ्या नशिबात असेल, तर तो परक्या देशात नाही तर माझ्या स्वतःच्या देशात, माझ्या स्वतःच्या लोकांमध्ये यावा,” या शब्दांत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या स्वदेश वापसीच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

बांगलादेशात प्रचंड संघर्षानंतर झालेल्या सत्ताबदलामुळे भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसीना यांनी ‘एसोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. “भारताने किंवा अमेरिकेने बांगलादेश सरकारवर दबाव आणून माझ्या सुरक्षित परतीचा मार्ग मोकळा करावा, अशी माझी कोणतीही अपेक्षा नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार; तरीही डिसेंबरमध्ये परतण्याचा निर्धार

ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शेख हसीना यांना बांगलादेश सोडणे भाग पडले होते. त्यानंतर बांगलादेशातील गुन्हे लवादाने जुलै-ऑगस्ट २०२४ मधील आंदोलकांवरील हिंसक कारवाईप्रकरणी नोव्हेंबर २०२५ मध्ये हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावली.

या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात पाऊल ठेवताच अटक, छळ किंवा थेट हत्येची भीती असतानाही हसीना आपल्या निर्णयावर ठाम आहेत. “बांगलादेशात उतरताच माझी हत्या होऊ शकते, मला अटक करून छळले जाऊ शकते, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीही डिसेंबर महिन्यात बांगलादेशात परतण्याचा माझा निर्णय अंतिम आहे,” असे त्या म्हणाल्या.

‘माझे पुनरागमन सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी’

शेख हसीना यांनी स्पष्ट केले की, त्यांची स्वदेश वापसी ही पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी नसून बांगलादेशातील जनतेच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आहे. बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि संकट असेच अनिश्चित काळासाठी राहू शकत नाही. त्यामुळे योग्य वेळ, तारीख आणि बांगलादेशात प्रवेश करण्याचा मार्ग लवकरच जाहीर केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. मुलाखतीदरम्यान त्यांनी संकटकाळात आश्रय दिल्याबद्दल भारत सरकार आणि भारतातील जनतेचे मनापासून आभार मानले.