पीटीआय, ढाका / नवी दिल्ली

बांगलादेशात अलिकडे झालेल्या हिंसाचार, हत्या, मोडतोड यासारख्या ‘अतिरेकी कृत्यां’ची चौकशी करून दोषींना कठोर शासन केले पाहिजे, अशी मागणी माजी पंतप्रधान शेख हसिना यांनी केली. ५ ऑगस्ट रोजी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतल्यानंतर हसिना यांनी प्रथमच एका निवेदनाद्वारे जाहीर वक्तव्य केले आहे.

हसिना यांचे अमेरिकास्थित पुत्र साजीब वाझेद जॉय यांच्या ‘एक्स’ समाजमाध्यमावर हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात हसिना यांनी लिहिले आहे, की जुलैपासून बांगलादेशात अनेक विद्यार्थी, शिक्षक, पोलीस, पत्रकार, आपल्या अवामी लिग पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांचा हिंसाचार आणि अराजकतेमुळे जीव गेला आहे. हिंसेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच नव्या राजवटीने याची सखोल चौकशी करून दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. नासधूस झाल्याप्रकरणी हसिना यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा >>>डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरण: तपास सीबीआयकडे; कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश, ममता सरकारला धक्का

‘बंगबंधू संग्रहालया’ची नासधूस होणे दु:खद आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यांचा हा अपमान आहे. देशवासियांकडून मला न्याय हवा आहे. – शेख हसिनामाजी पंतप्रधान, बांगलादेश