Sheikh Hasina extradition India court decision : बांगलादेशातील पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी तारीक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारकडून पुन्हा करण्यात आली आहे. मात्र, भारतातील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, अशा प्रकारच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवर भारताच्या न्यायव्यवस्थेकडून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय राजकीय किंवा राजनैतिक पातळीवर घेतला जाणार नाही. दरम्यान, ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात हा प्रश्न अधिक टोकाच्या भूमिकेपासून दूर नेण्यासाठी सखोल चर्चा सुरू असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय न्यायालय घेईल निर्णय

भारत सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “प्रत्यार्पणाबाबतचा अंतिम निर्णय आपल्या न्यायालयांकडून घेतला जाईल. हा राजकीय किंवा राजनैतिक निर्णय असणार नाही. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान शेख हसीना यांच्यावर आरोप असलेले गुन्हे भारतीय कायद्यानुसारही गुन्हे ठरतात का, हे सिद्ध करावं लागेल.”

डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार?

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शेख हसीना यांनी स्वतःच यावर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याचा मानस व्यक्त केला आहे. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बांगलादेशात कधी परतणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा संदर्भ देत त्यांनी म्हटलं होतं, “डिसेंबर हा आमचा विजयाचा महिना आहे. त्यामुळे मला डिसेंबरमध्ये मायदेशी परतायचं आहे.”

बांगलादेशात शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांच्या अवामी लीग पक्षावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं प्रत्यार्पण करण्याची मागणी आणि दिल्ली-ढाका यांच्यातील सध्याचे राजनैतिक संबंध यांना वेगळं करता येणार नाही, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहमान यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीबाबत विचारलं असता, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते यापूर्वी म्हणाले होते, “आम्ही या प्रकरणाचा आमच्या प्रस्थापित प्रक्रियेनुसार आढावा घेत आहोत. माझ्याकडे सांगण्यासारखी कोणतीही माहिती उपलब्ध झाल्यास मी ती कळवेन.”

परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, बांगलादेशने भारताकडे केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीसोबत २०१३ मध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या प्रत्यार्पण करारातील तरतुदींनुसार आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे जोडण्यात आली आहेत.

ऑगस्ट २०२४ मध्ये ढाक्यात झालेल्या मोठ्या जनआंदोलनानंतर गेल्या दोन वर्षांपासून शेख हसीना यांना नवी दिल्लीतील एका अज्ञात ठिकाणी आश्रय आणि सुरक्षा देण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी त्यांनी राजधानीतून ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी आपण “मायदेशी परतण्यासाठी निर्धार केला आहे”, असं त्यांनी जाहीर केले होते.

पदच्युत अवामी लीगचे विद्यमान आणि माजी खासदार सांगतात की, अनौपचारिक आश्रयात असतानाही शेख हसीना बांगलादेशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. त्या अधूनमधून प्रत्यक्ष भेटी घेऊन चर्चा करतात आणि नियमितपणे टेबल टेनिसही खेळतात. ७८ वर्षीय शेख हसीना वर्षाच्या अखेरीस ढाक्यात परतण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचेही पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.