बांगलादेशात २०२४ मध्ये सरकारविरोधी झालेल्या निदर्शनांमुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, तेव्हा त्यांनी बांगलादेशातून पलायन केलं होतं आणि भारतात आश्रय घेतला होता. सध्याही शेख हसीना या भारतात असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, बांगलादेश भारताकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्याची शक्यता असतानाच काही दिवसांपूर्वी शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याबाबत मोठं भाष्य केलं होतं.

डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार असल्याचं शेख हसीना यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. दरम्यान, शेख हसीना बांगलादेशात परतणार असल्याच्या चर्चांवर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भूमिका मांडली आहे. ‘या प्रकरणाबाबत भारताच्या दृष्टिकोनात कोणताही बदल झालेला नाही’, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने काय भूमिका मांडली?

शेख हसीना बांगलादेशात सुरक्षित परतण्याच्या संदर्भात भारत बांगलादेशच्या संपर्कात आहे का? या प्रश्नावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं की, “या प्रकरणाबाबत आमच्या (भारताच्या) दृष्टिकोनात कोणताही बदल झालेला नाही. प्रत्यार्पणाचा कोणताही विषय हा कायदेशीर मुद्दा असतो आणि त्यानुसारच त्यावर कार्यवाही केली जाईल.” या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याबाबत काय म्हटलं?

काही दिवसांपूर्वी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने घेतलेल्या एका मुलाखतीत शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याबाबत भाष्य केलं होतं. शेख हसीना यांनी म्हटलं होतं की, मायदेशात माझ्या मृत्यूचा धोका आहे. पण तरीही आता देशात परतण्याची वेळ आली आहे. अवामी लीगचे अनेक नेते आणि त्या स्वतः मायदेशात परतणार असून न्यायालयासमोर उभं राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

बांगलादेशच्या एका न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. यावर बोलताना शेख हसीना यांनी म्हटलं होतं की, “जर माझा मृत्यू होणारच असेल तर तो माझ्या देशातील मातीतच व्हावा. माझ्या आई-वडिलांना तिथेच मरण आलं होतं. मी कारावासाच्या शिक्षेला घाबरत नाही. यापूर्वीही मी तुरुंगात गेलेली आहे. जर माझ्या सरकारकडून काही चुका झाल्या असतील तर त्याचा निर्णय न्यायालय किंवा विरोधी पक्ष नाही तर जनता घेईल. जेव्हा एखादं सरकार दीर्घकाळ सत्तेत राहतं, तेव्हा त्यांच्याकडून काही चुका होतात. मात्र त्या सरकारने काय चांगलं केलं आणि काय चुकीचं केलं, याचा निर्णय जनता घेईल.”

फाशीची शिक्षा का सुनावली?

बांगलादेशमध्ये २०२४ साली झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी बांगलादेशच्या विशेष लवादाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवहक्क कार्यालयानुसार, या आंदोलनामध्ये सुमारे १४०० जणांचा मृत्यू झाला होता. ‘निःशस्त्र जमावाचे आंदोलन पांगवण्यासाठी बळाचा वापर करण्याचे आदेश शेख हसीना यांनी दिल्याचा आरोप आहे.