बांगलादेशात २०२४ साली झालेल्या निदर्शनांनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला होता. तेव्हापासून शेख हसीना या भारतात असल्याचं सांगितलं जातं. मात्र, गेल्या दोन वर्षांत शेख हसीना या एकदाही सार्वजनिकरीत्या समोर आलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी शेख हसीना यांनी एका मुलाखतीत बोलताना आपण डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार असल्याची घोषणा केली होती.

मायदेशी परतण्याबाबत दिलेल्या संकेतानंतर आणि गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच आता शेख हसीना या सार्वजनिकरीत्या माध्यमांसमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत ‘फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साऊथ एशिया’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शेख हसीना व्हर्च्युअल पद्धतीने हजेरी लावत संवाद साधणार आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हा संवादाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७:३० या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचं लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. यावेळी शेख हसीना या त्यांच्या भविष्यातील योजना आणि बांगलादेशात परतण्याबाबतच्या संभाव्य निर्णयावरही बोलण्याची शक्यता आहे.

शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याबाबत काय म्हटलं होतं?

शेख हसीना यांनी काही दिवसांपूर्वी बांगलादेशात परतण्याबाबत भाष्य केलं होतं. शेख हसीना यांनी म्हटलं होतं की, मायदेशात माझ्या मृत्यूचा धोका आहे. पण तरीही आता देशात परतण्याची वेळ आली. अवामी लीगचे अनेक नेते आणि त्या स्वतः मायदेशात परतणार असून न्यायालयासमोर उभं राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे.

बांगलादेशच्या एका न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. यावर बोलताना शेख हसीना यांनी म्हटलं होतं की, “जर माझा मृत्यू होणारच असेल तर तो माझ्या देशातील मातीतच व्हावा. माझ्या आई-वडिलांना तिथेच मरण आलं होतं. मी कारावासाच्या शिक्षेला घाबरत नाही. यापूर्वीही मी तुरुंगात गेलेली आहे. जर माझ्या सरकारकडून काही चुका झाल्या असतील तर त्याचा निर्णय न्यायालय किंवा विरोधी पक्ष नाही तर जनता घेईल. जेव्हा एखादं सरकार दीर्घकाळ सत्तेत राहतं, तेव्हा त्यांच्याकडून काही चुका होतात. मात्र त्या सरकारने काय चांगलं केलं आणि काय चुकीचं केलं, याचा निर्णय जनता घेईल.”

फाशीची शिक्षा का सुनावली?

बांगलादेशमध्ये २०२४ साली झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी बांगलादेशच्या विशेष लवादाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेली आहे.