Sheikh Hasina in India : बांगलादेशात आरक्षणावरून सुरू असलेला हिंसाचार उफाळल्याने शेख हसीना यांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. देशातून पलायन करण्याआधी त्यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. १९७५ सालापासून शेख हसीना यांनी भारतात दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं. त्यामुळे बांगलादेशातून इतर देशात जाण्याआधी त्यांनी यावेळी पुन्हा भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशातून भारतात त्यांना सुरक्षित आणण्याकरता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोलाची कामगिरी पार पाडली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना हवाई दलाच्या जेटमधून भारतात आल्या. भारतात येताना कोणत्याही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज होत्या. भारतीय वायुसेना बांगलादेशाच्या हवाई क्षेत्रावर सक्रियपणे निरीक्षण करत होते. सोमवारी (५ ऑगस्ट) दुपारी ३ च्या सुमारास एक विमान भारताच्या दिशेने येत असल्याचे त्यांना दिसलं. विमानात कोण आहे हे हवाई संरक्षण कर्मचाऱ्यांना ठाऊक असल्याने या विमानाला भारतात जाण्याची परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे. हेही वाचा >> Bangladesh PM Sheikh Hasina : २५ वर्षांपासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोण? राफेल तैनात बांगलादेश ते भारत असा प्रवास सुरक्षित व्हावा याकरता राफेल विमानेही तैनात करण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या हाशिमारा हवाई तळावरून १०१ स्क्वॉड्रनमधील दोन राफेल लढाऊ विमाने बिहार आणि झारखंडमध्ये तैनात करण्यात आली होती. ही राफेल विमाने शेख हसीना यांच्या विमानाच्या मार्गावरच होती. या लढाऊ विमानांवर सुरक्षा यंत्रणांकडून बारकाईने निरिक्षण केले जात होते. तसंच विमान आणि भारतातील सुरक्षा अधिकारी सतत संपर्कात होते. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि जनरल उपेंद्र द्विवेदी हे या मोहिमेकडे लक्ष देऊन होते. हेही वाचा >> Bangladesh Political Crisis: बांगलादेशमधील परिस्थितीवर भारतानं भूमिका केली स्पष्ट; परराष्ट्रमंत्री म्हणाले, “लष्कराला सतर्क…” भारतात येताच अजित डोवाल यांची घेतली भेट सोमवारी सायंकाळी ५.४५ च्या दरम्यान शेख हसीना भारतातील हिंडन हवाई तळावर उतरल्या. तिथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा होऊन बांगलादेशातील सद्यस्थिती, भविष्यातील योजनांवर चर्चा केली. त्यानतंर डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीला माहिती दिली. बांगलादेशच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत काय झाली चर्चा? “सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीत बांगलादेशमधील घडामोडींसंदर्भात माहिती देण्यात आली. सर्व पक्षांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्यांचे आभार”, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. सोबत त्यांनी बैठकीतील काही फोटोही शेअर केले आहेत. हेही वाचा >> बांगलादेशमधील घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा राहुल गांधींनी लोकसभेतील चर्चेदरम्यान बांगलादेशमधील घडामोडींसाठी परकीय शक्ती जबाबदार असल्याची काही माहिती आपल्याकडे आहे का? अशी विचारणा केली होती. त्यावर जयशंकर यांनी “आमच्याकडे फक्त पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने बांगलादेशमधील आंदोलनाचं समर्थन करणारा डीपी ठेवला होता अशी माहिती आहे”, असं उत्तर दिलं. तसेच, “बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असण्याची शक्यता आहे”, अशी माहितीही जयशंकर यांनी बैठकीत दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. शेख हसीना यांची पुढची योजना काय? दरम्यान, या बैठकीत राहुल गांधींनी सरकारला शेख हसीना यांच्या पुढील नियोजनाबाबतही विचारणा केली. मात्र, त्यावर सविस्तर उत्तर देण्यास जयशंकर यांनी नकार दिला. “भारत सरकारनं यासंदर्भात शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातली माहिती आत्ताच उघड करता येणार नाही”, असं जयशंकर यांनी सांगितलं.