Sheikh Hasina son Sajeeb Wazed Joy : बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे. तिथल्या सरकारी नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाविरोधातील आंदोलन हिंसक बनलं असून सोमवारी (५ ऑगस्ट) सकाळी शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ त्यांनी बांगलादेशमधून पलायन केलं असून त्या आता भारतात दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या कार्यालयावर हल्ला केला असून या परिसरात जाळपोळही केली आहे. देशातील गंभीर परिस्थिती पाहता बांगलादेशी लष्कराने देशाची कमान आपल्या हाती घेतली आहे. लष्करप्रमुख म्हणाले, “बांगलादेशमध्ये लवकरच अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल”. दरम्यान, शेख हसीना यांचे पुत्र साजिब अहमद वाजेद जॉय यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. साजिब अहमद वाजेद यांनी म्हटलं आहे की त्यांची आई शेख हसीना कदाचित आता बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीबीसीशी बोलताना साजिब अहमद वाजेद यांनी सांगितलं की त्यांच्या आईने रविवारीच पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. देशात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले, तरी त्यांच्याविरोधात आंदोलन चालूच आहे. सरकारविरोधातील लोकांच्या टोकाच्या रोषामुळे निराश होऊन त्यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला. साजिब वाजेद हे काही वर्षांपूर्वी शेख हसीना यांचे सल्लागार म्हणून काम पाहायचे.

हे ही वाचा >> Bangladesh Protests : बांगलादेशच्या घडामोडींचे भारतातही पडसाद, सीमेवर बंदोबस्त वाढवला, रेल्वे सेवा तात्पुरती रद्द

साजिब वाजेद काय म्हणाले?

साजिब वाजेद म्हणाले, माझ्या आईने आता वयाची सत्तरी पार केली आहे. त्यांनी कठोर परिश्रम घेतले तरी काही मोजक्या लोकांनी सरकारविरोधात बंड केलं. पाठोपाठ देशातील बहुसंख्य जनता त्यास बळी पडली आहे. त्यामुळे मला आता असं वाटतंय की त्या (शेख हसीना) आता बांगलादेशला परतणार नाहीत. माझ्या आईने देशाची कमान आपल्या हाती घेतल्यानंतर देशात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. आई पंतप्रधान झाली तेव्हा बांगलादेश हा जगातील अपयशी देशांच्या यादीत होता. हा एक गरीब देश मानला जात होता. परंतु, आता आपला देश आशिया खंडातील उदयोन्मुख देशांपैकी एक आहे. आपल्या देशाने अनेक आघाड्यांवर मोठी प्रगती केली आहे.

हे ही वाचा >> शेख हसीना भारतात अजित डोभाल यांना भेटल्या, पुढची रणनीती ठरली?

शेख हसीना यांच्यावरील विरोधकांचे आरोप काय?

शेख हसीना यांच्या विरोधकांनी व टीकाकारांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्यावर घराणेशाही व नागरिकांचं स्वातंत्र्य हिरावल्याचे आरोप होत आहेत. हसीना यांचे विरोधक म्हणतात की त्यांच्या धोरणांमुळे बांगलादेशचा विकास व आर्थिक प्रगती खुंटली आहे. दरम्यान, साजिब वाजेद यांनी सरकारवर होत असलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, “रविवारी १३ पोलिसांना बेदम मारहाण झाली. अशा स्थितीत आपण पोलिसांकडून काय अपेक्षा करायला हवी.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheikh hasina may not return to bangladesh politics says son sajeeb wazed asc
Show comments