Sheikh Hasina Bangladesh Return news: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना शेख यांना ऑगस्ट २०२४ मध्ये पदावरून पदच्यूत करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांनी भारतात आश्रय घेतला. आता त्यांनी बांगलादेशमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये परतणार असल्याचे त्या म्हणाल्या. “ते मला अटक करू शकतात. माझी हत्याही करू शकतात. पण तरीही मी परतणार आहे”, असे म्हणत शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये न्यायालयाला शरण जाणार असल्याचे सांगितले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेला फोनद्वारे दिलेल्या मुलाखतीत शेख हसीना यांनी हा दावा केला. मायदेशात माझ्या मृत्यूचा धोका आहे. पण तरीही आता देशात परतण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या. अवामी लीगचे अनेक नेते आणि त्या स्वतः मायदेशात परतणार असून न्यायालयासमोर उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

माझ्या देशातील मातीतच मरणार

बांगलादेशच्या एका न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. यावर बोलताना त्या भावुक होत म्हणाल्या, जर माझा मृत्यू होणारच असेल तर तो माझ्या देशातील मातीतच व्हावा. माझ्या आई-वडिलांना तिथेच मरण आले होते.

शेख हसीना यांनी निवडणूक जिंकून पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्यानंतर २०२४ मध्ये त्यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले होते. यावेळी बांगलादेशमधील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हसीना यांनी आपल्यावरील आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.

माझा निर्णय जनता घेईल

शेख हसीना मुलाखतीत पुढे म्हणाल्या, मी कारावासाच्या शिक्षेला घाबरत नाही. मी यापूर्वीही तुरुंगात गेलेली आहे. जर माझ्या सरकारकडून काही चुका झाल्या असतील तर त्याचा निर्णय न्यायालय किंवा विरोधी पक्ष नाही तर जनता घेईल. जेव्हा एखादे सरकार दीर्घकाळ सत्तेत राहते, तेव्हा त्यांच्याकडून काही चुका होतात. मात्र त्या सरकारने काय चांगले केले आणि काय चुकीचे केले, याचा निर्णय जनता घेईल.

फाशीची शिक्षा का?

बांगलादेशमध्ये २०२४ साली झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी बांगलादेशच्या विशेष लवादाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवहक्क कार्यालयानुसार, या आंदोलनामध्ये सुमारे १४०० जणांचा मृत्यू झाला. ‘निःशस्त्र जमावाचे आंदोलन पांगविण्यासाठी बळाचा वापर करण्याचे आदेश हसीना यांनी दिले. स्फोटक वक्तव्ये केली. त्यांच्यामुळे ढाका आणि आसपासच्या क्षेत्रांत अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले,’ असे आरोप त्यांच्यावर झाले.

बांगलादेशमध्ये सत्ताबदल

शेख हसीना यांना पदच्यूत केल्यानंतर तब्बल दीड वर्ष हंगामी सरकारकडून देशाचा कारभार हाकला गेला. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने (BNP) मोठा विजय मिळवला. बीएनपी सत्तेच येताच त्यांनी शेख हसीना यांच्यावर खटला चालविण्यासाठी त्यांचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी भारताकडे केली.