“देशातील सरकारनं भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय घेतला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैर असलेलेच काही कट्टरपंथी मुस्लीम त्या निर्णयाला विरोध करत आहेत,” असं वक्तव्य शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्याद्वारे संदेश दिला आहे.

“पंतप्रधानांशी वैर असलेलेच काही मुस्लीम लोक लॉकडाउनसारख्या निर्णयाला विरोध करत आहेत. तसंच या लॉकडाउनमध्ये नियमांचं पालन देखील करत नाहीयेत. देव न करो की हा आजार मुस्लीम भागांमध्ये पसरो. जर असं झालं आणि त्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी या लोकांनाच जबाबदार धरण्यात यावं. तसंच त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सरकारनं खटले दाखल केले पाहिजेत,” अशी मागणी रिझवी यांनी केली आहे.

आणखी वाचा- तबलिगी मर्कझ: मोदी सरकारमधील नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणतात, ” हा तर तालिबानी गुन्हा, यांना…”

तबलिकी जमात म्हणजे “करोना बॉम्ब’
करोनाच्या पार्श्वभूमीवर ही संघटना एक कारस्थान रचत आहे. लोकांमध्ये करोनाचा प्रसार करण्यासाठी लोकांना पाठवण्यात येत आहे. हा सर्वात मोठा धोका आहे, असं मत रिझवी यांनी तबलिकी जमातच्या कार्यक्रमानंतर व्यक्त केलं. यासाठी सरकारला कठोर पावलं उचलण्याची गरज असून त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

आणखी वाचा- Coronavirus : निझामुद्दीन येथील कार्यक्रमातून बडोद्यात परतलेले पाच जण होम क्वारंटाइन

अन्य राज्यातील लोकांना करोनाची लागण
निजामुद्दीन येथील कार्यक्रमामुळे इतर राज्यांमधील लोकांनाही करोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंदमान निकोबार येथील सहा जणांना लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. हे सर्वजण कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यानंतर कोलकातामार्गेत पोर्ट ब्लेअरला परतले होते. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रीनगरमधील ६५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. तर आंध्र प्रदेशातील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या मशिदीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसंच गेल्या एक आठवड्यापासून परिसरात मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.