अकाली दलाने १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करून याप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे हत्याकांड काँग्रेसने केले होते व त्यात दिल्लीत हजारो निरपराध शीख लोक मारले गेले होते, असा आरोप अकाली दलाने केला.
शून्य प्रहरात अकाली दलाचे नेते प्रेम सिंग चांदुमाजरा यांनी काँग्रेस सदस्यांच्या अनुपस्थितीत या प्रश्नावर सांगितले की, काँग्रेसने लोकशाहीचा खून केला. दिल्लीत १९८४ मध्ये अनेक शीख लोकांना दंगलीत ठार करण्यात आले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर या दंगली झाल्या होत्या. जेव्हा मोठी झाडे पडतात तेव्हा धरणी हादरतेच, असे उद्दाम वक्तव्य तेव्हा काँग्रेसच्या एका नेत्याने केले होते, इतकी वर्षे होऊनही आरोपींना शिक्षा झाली नाही. या शीख विरोधी दंगलीत अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते आरोपी आहेत.गेल्या वर्षी मोदी सरकार आले, त्यांनी विशेष तपास पथक स्थापन केले नंतर दंगलग्रस्तांना पाच लाख रूपये भरपाई जाहीर केली.