Shikhar Dhawan Court case Update: भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची प्रेयसी सोफी शाईन नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच शिखर धवनला एक चांगली बातमी मिळाली आहे. दिल्लीतील पटियाला कौटुंबिक न्यायालयाने शिखर धवनच्या बाजूने निकाल देत असताना पूर्व पत्नी आयशा मुखर्जीला ५.७ कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. ऑस्ट्रेलियातील अंतरिम मालमत्ता तडजोड प्रकरणात हे पैसे पहिल्या पत्नीला मिळाले होते. सदर पैसे फसवणूक आणि धमकावून घेतल्याचे पटियाला न्यायालयाने म्हटले आहे.
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला होता. पटियाला न्यायालयाने या घटस्फोटाला मंजूरी दिली होती. तेव्हापासून शिखर धवनची न्यायालयीन लढाई सुरू होती. पटियाला हाऊस न्यायालयाचे न्यायाधीश देवेंद्र कुमार गर्ग यांनी निर्णय देताना म्हटले की, ऑस्ट्रेलियाच्या कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल भारतीय विवाह कायद्याच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे शिखर धवन आणि त्याच्या माजी पत्नीमध्ये झालेली तडजोड ही बळजबरी, फसवणुकीतून झाली आहे.
आयशा मुखर्जी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. मालमत्ता विक्रीतील तडजोड प्रकरणात आयश मुखर्जीने ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयात धाव घेतली होती. पटियाला हाऊस न्यायालयाने सांगितले की, शिखर धवन आणि त्याच्या पत्नीमधील वैवाहिक वादाची सुनावणी घेण्याचा ऑस्ट्रेलियन न्यायालयाला अधिकार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाने कोणता निर्णय दिला?
आयशा आणि धवन यांच्यात २०२१ ते २०२२४ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयात संपत्तीच्या वाटपावरून अनेक प्रकरणे दाखल झाली. फेब्रुवारी २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या न्यायालायने निकाल देताना म्हटले की, धवनच्या संपत्तीमधील १५ टक्के वाटा आयशाला मिळेल. यानुसार तिला ७.४६ कोटी रुपयांची संपत्ती बाळगण्याची परवानगी दिली गेली. त्याशिवाय शिखर धवनकडून अतिरिक्त १५.९५ कोटी रुपये मिळाले. दरम्यान एका संपत्तीच्या विक्रीतून आयशाला ५.७ कोटी रुपये मिळाले.
शिखर धवनने पटियाला न्यायालयात घेतली धाव
शिखर धवनने पटियाला न्यायालयात पत्नीविरोधात खटला दाखल केला होता. त्याने म्हटले, आयशा आणि त्याचे लग्न २०१२ मध्ये झाले होते. लग्नाच्या काही काळानंतर आयशाने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवून त्याचे करिअर उध्वस्त करण्याची धमकी दिली.
शिखर धवनने पुढे सांगितले की, ऑस्ट्रेलियातील मालमत्ता त्याने स्वतःच्या पैशांनी विकत घेतली होती. मात्र आयशा मुखर्जीने धकमी देऊन बळजबरीने काही मालमत्ता स्वतःच्या नावावर आणि काही दोघांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकला.

