मोदी-शरीफ यांच्या भेटीबाबत भाजपचा उत्साह, काँग्रेसचा विरोध, सेनेची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची शुक्रवारी घेतलेली भेट आणि तिचे फलित याबद्दल विविध राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची शुक्रवारी घेतलेली भेट आणि तिचे फलित याबद्दल विविध राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये हा ‘प्रकाशाचा किरण’ असल्याचे वर्णन भाजपने केले, तर काँग्रेसने मात्र यात काहीही ऐतिहासिक नसून, कुठलीच प्रगतीही झालेली नसल्याचे सांगितले.
प्रादेशिक पक्षांनी त्यांच्यापुरती वेगळी भूमिका घेतली. जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी आणि विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने भारत- पाकिस्तानदरम्यानच्या संवादाचे स्वागत केले, तर आपला मित्रपक्ष भाजपने या मुद्दय़ावर दाखवलेल्या उत्साहाशी शिवसेनेने सहमती व्यक्त केली नाही.
पाकिस्तानने भारताची ‘दहशतवादाची’ व्याख्या प्रथमच स्वीकारली असल्याचे सांगून भाजपचे प्रवक्ते एम.जे. अकबर रशियातील उफा येथे झालेल्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या बैठकीच्या निष्पत्तीचे स्वागत केले. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील नाते वृद्धिंगत होण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. या बैठकीचे वर्णन एका शब्दात करायचे झाले, तर ‘ब्रेकथ्रू’ (एक मोठा अडथळा दूर झाला) असे करता येईल. याचे कारण म्हणजे बहुधा द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रकाशाचा किरण दिसत आहे. ‘सर्व प्रकारचा दहशतवाद अमान्य आहे’ हे मान्य करून पाकिस्तानने भारताची दहशतवादाची व्याख्या प्रथमच मान्य केली असल्याचे अकबर म्हणाले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आरोपी असलेल्या दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे धोरण सात वर्षे राबवल्यानंतर, या खटल्याच्या सुनावणीला गती देण्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. भारताने पुरवलेले मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानमधील सूत्रधार यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिग व त्यांच्या आवाजाचे नमुनेही पाकिस्तानने स्वीकारले असून ही मोठी गोष्ट असल्याचे मत अकबर यांनी नोंदवले.
काँग्रेसने मात्र तत्परतेने भाजपचा या मुद्दय़ावरील उत्साह अमान्य केला. या बैठकीचे फलित म्हणजे भारताने दहशतवादाबाबत दीर्घ काळापासून घेतलेली भूमिका आणि पाकिस्तानकडून मान्य झालेली बांधीलकी मवाळ होणे ही आहे. पाकिस्तानचा मुद्दा सोडवण्यात मोदी सरकारची विसंगती दिसून येत असून, हा मुद्दा कसा हाताळावा याबाबत त्यांचे काही स्पष्ट धोरण नसल्याचे मोदी यांच्या कृतीवरून दिसते, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केला.
दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनावरही काँग्रेसचा आक्षेप असल्याचे सांगताना शर्मा म्हणाले, की आवाजाच्या नमुन्यांसह मुंबई हल्ल्याचे सर्व पुरावे पाकिस्तानला आधीच देण्यात आले आहेत.
भारत-पाकिस्तानमधील रखडलेला संवाद पुन्हा सुरू करण्याचे काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी आणि विरोधी नॅशनल कॉन्फरन्स या दोघांनीही स्वागत केले आहे. आमच्या पंतप्रधानांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलेला धाडसी प्रतिसाद यांचे आम्ही कौतुक करतो, असे पीडीपीचे नेते व शिक्षणमंत्री नईम अख्तर म्हणाले. तर फलनिष्पत्ती होण्यासाठी संवादाची प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहील, अशी आशा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. पाकिस्तानने काश्मीरचा उल्लेख केला नसला, तरी काश्मीरशी संबंधित सर्व मुद्दय़ांवर ते योग्य ते लक्ष देतील असेही ते म्हणाले.
भाजपचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेने मात्र मोदी व शरीफ यांच्या भेटीचे वर्णन ‘दुर्दैवी’ असे करताना, या घडामोडीबाबत भाजपच्या उत्साहाशी सहमत होणे नाकारले. सीमेवरील परिस्थितीत काहीही बदल झालेला नसून, लोकांना मोदीजींकडून फार मोठय़ा अपेक्षा आहेत, असे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले. सध्याची परिस्थिती बदलण्यास मोदी सक्षम असून, आपल्या शेजाऱ्याला ज्या रीतीने कळतो, त्या प्रकारचा धडा शिकवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena cong play down bjp euphoria over modi sharif meet

ताज्या बातम्या