शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(सोमवार) दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपा यांच्यावर टीका केली. “शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही.” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला आव्हान देखील दिलं. याचबरोबर, “हे काय रामशास्त्रींचं राज्य नाही, ही राजकीय चढाओढ आहे.” असं म्हणत भाजपावर देखील त्यांनी निशाणा साधला.

ज्याच्या हाती ससा तो पारधी –

संजय राऊत म्हणाले, “या विधीमंडळातील लढाया या चालूच राहतील. ज्याच्या हाती ससा तो पारधी अशी एक म्हण आहे आपल्याकडे, याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे. विधीमंडळाच्या पीठासीन अधिकारी म्हणून ज्याला बसवलं जातं तो सत्ताधारी पक्षाचा माणूस असतो आणि तो त्यांच्या पद्धतीने निर्णय घेत असतो. मग राज्यसभा असो, लोकसभा असो किंवा मग विधानसभा असो. पक्षाच्या विरुद्ध बाहेर कारवाया केल्या, राज्यसभेत नाही, संसदेत नाही म्हणून शरद यादव यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. बाहेर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल. शरद यादव आणि अन्य काही लोकांचं निलंबन केलं. उपराष्ट्रपती असलेले राज्यसभेचे चेअरमन असलेले व्यंकय्या नायडू यांनी. तो नियम आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या विधीमंडळात लावायला गेलो. तेव्हा आम्हाला तो न्याय मिळाला नाही. हे कितपत योग्य आहे?”

तुमचा पक्ष खरा कसा असू शकतो? हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा –

तसेच, “कायदा सर सगळ्यांसाठी समान असेल, विधीमंडळ आणि संसदेसाठी तर एका ठिकाणी एक न्याय, दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय सोयीप्रमाणे जो सत्तेवर आहे, जो खुर्चीवर आहे त्याने त्याच्या मर्जीने न्याय द्यायचा. याला मी संसदीय लोकशाही मानत नाही. या संसदीय लोकशाहीला वेळेनुसार मालक बदलत जातो आणि निर्णय होत असतात. सध्या महाराष्ट्रात तेच सुरू आहे. उपाध्यक्ष नरहर झिरवळ यांनी एक निर्णय दिला, की १६ आमदारांनी व्हीप झुगारला हे त्यांनी एकदा जाहीर केल्यावर त्या खुर्चीवर आलेल्या दुसऱ्या अध्यक्षाने निर्णय बदलला. कारण, ते दुसऱ्या पक्षाचे नेते होते. हे काय रामशास्त्रींचं राज्य नाही. विधीमंडळाच्या नियमांचं पालन केलं असं मी मानत नाही. ही राजकीय चढाओढ आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला यातून काय मिळणार आहे? मूळ पक्ष शिवसेना आहे. आपण शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला आहात. शिवसेना पक्षाने आपल्याला निवडून आणण्यासाठी शर्थ केलेली आहे. आपण फुटलेला आहात, आपण बाहेर गेलला आहात. तुमचा पक्ष खरा कसा असू शकतो? हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि मग कायद्याला विचारा. अगोदर तुमच्या मनाला विचारा की आम्ही खरोखर शिवसेनेचे सदस्य किंवा आमदार आज राहिलो आहोत का? हा प्रश्न खरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांना देखील पडला पाहिजे आणि विधीमंडळ सचिवालयाला पडला पाहिजे. पण शेवटी मगाशी मी जसं म्हणालो ज्याच्या हाती ससा तो पारधी.” असंही राऊतांनी म्हटले.

ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल –

याचबरोबर, “आम्ही नक्कीच कायदेशीर लढाई लढू. कायदेशीर लढाई लढावीच लागेल ११ जुलै रोजी. सर्वोच्च न्यायालयात त्या संदर्भात एक महत्वाची सुनावणी आहे. खरं म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका प्रलंबित असताना, अशाप्रकारे विधीमंडळात निवडणुका घेणं बेकायदेशीर आहे. जोपर्यंत ११ तारखेचा निकाल लागत नव्हता, तोपर्यंत अशा प्रकारची निवडणूक घेणं हे घटनाबाह्य आहे. ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेणं गरजेचं होतं.” असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांनी टीका केली.

…असं म्हणणं हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान –

याशिवाय “शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही. विधीमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, शहरांमध्ये शिवसेना आजही तीच आहे. काही लोक सोडून गेले म्हणून म्हणजे शिवसेना कमजोर झाली, असं म्हणणं हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. या राज्याची जनता ही बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान कधी सहन करणार नाही. विधीमंडळात नक्कीच आमच्या पक्षात फूट पडलेली आहे. काही लोकांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. ती भूमिका त्यांनी का घेतली? हा प्रश्न त्यांनाही पडला असेल. कोणत्या परिस्थितीत घेतली. ज्या पद्धतीने सभागृहात ईडीच्या नावाने गर्जना सुरू होत्या त्यावरून आपल्याला कळलं असेल की हा निर्णय वर पासून खालपर्यंत का घेण्यात आला. पण आम्हाला याची पर्वा नाही. आम्ही अशा प्रसंगांना घाबरत नाही.” असा इशारा संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला दिला.