शिवसेनेने भाजपाकडून आज होत असलेल्या एकदिवसीय उपोषणावर टीकास्त्र सोडले आहे. दुसरीकडे मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिल्लीत भाजपाच्या उपोषणाला हजेरी लावून पक्ष प्रमुखांच्या भूमिकेलाच हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, माध्यमांत वृत्त येताच गीतेंनी उपोषण स्थळावरून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेकडून विरोध होत असताना त्यांचेच मंत्री भाजपा नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उपोषणाला बसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

काँग्रेस आणि भाजपाचे उपोषण म्हणजे मोर-लांडोर यांची स्पर्धा-उद्धव ठाकरे

देशातील मोठ्या वर्गाचे हाल आणि उपासमार थांबत नाहीत, त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. अशात या उपवास नाट्याने काय साध्य होणार? अशी टीका शिवसेनेने सामना या आपल्या मुखपत्रातून केली होती. परंतु, गीते यांनी ही सामनाची भूमिका होती. सामनाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी सरकारचा प्रतिनिधी आणि मंत्री म्हणून या उपोषणाला उपस्थित असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकसभेचे कामकाज रोखले गेले त्याच्या निषेधार्थ मी उपोषणाला आलो असल्याचे ते म्हणाले.

एनडीएच्या घटक पक्षाचे कोणतेही नेते अद्याप उपोषणाला दिसले नाहीत. पण शिवेसेनेचे अनंत गीते यांनी हजेरी लावली. माध्यमांत वृत्त येताच गीते यांनी उपोषण स्थळावरून काढता पाय घेतला. दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा विरोध कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ग्रामस्थांच्या बाजूने शिवसेना उभी असल्याचे ते म्हणाले.