खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावर बंदी घालणाऱ्या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेने लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा प्रस्ताव दाखल केला. दरम्यान, रवींद्र गायकवाड यांनी काढलेले मुंबई-दिल्ली विमानाचे तिकिट एअर इंडियाने पुन्हा एकदा रद्द केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.


खासदार गायकवाड यांनी मुंबई-दिल्ली विमानाचे तिकिट काढले होते. परंतु, एअर इंडियाने ते पुन्हा एकदा रद्द केले आहे. शिवसेना खासदारांची लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे अशोक गजपती यांनी कालच सांगितले होते.
सोमवारी अडसूळ यांनी लोकसभेत गायकवाड यांच्यावरील बंदीचा मुद्दा मांडला होता. विनोदवीर कपिल शर्मानेही मद्यधूंद अवस्थेत विमानात गैरवर्तन केले होते. पण त्याच्यावर बंदी घातली गेली नाही, असे अडसूळ यांनी निदर्शनास आणून दिले. गायकवाड यांच्यावरील कारवाईवरुन अडसूळ आक्रमक झाले होते. अडसूळ यांनी बंदीचा मुद्दा उपस्थित केल्यावर नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी या प्रश्नावर उत्तर दिले होते. नियम हे सर्वांसाठीच समान आहे असे राजू यांनी स्पष्ट केले होते. हवाई वाहतुकीदरम्यानच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे कठोर नियम आहे. पण या नियमांच्या कचाट्यात खासदार अडकेल असे स्वप्नातही वाटले नव्हते असे त्यांनी म्हटले होते.