शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिल्लीत शिष्टाई

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी कॉंगे्रस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत संयुक्त पुरोगामी आघाडीबाबत (यूपीए) चर्चा झाली. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी राहुल यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राऊत यांनी या बैठकीत केले. काँगे्रसशिवाय विरोधकांची आघाडी अशक्य असल्याचा पुनरूच्चार राऊत यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.

केंद्रातील भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधक सरसावले असले तरी त्यांच्यात एकीचा अभाव आहे. पश्चिाम बंगालमधील मोठ्या विजयानंतर सत्ताधारी तृणतूल कॉंगे्रसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ‘यूपीए’ आहेच कुठे, असा सवाल काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यात केला होता.

या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत ‘यूपीए’बाबत चर्चा केली. मात्र, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच जाहीर भाष्य करेऩ, असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्ना सुरू आहेत का, असे विचारले असता, राऊत यांनी त्यास होकारार्थी उत्तर दिले.

राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना आणि कॉंगे्रस हे घटक पक्ष आहेत. राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजपप्रणीत ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर पडली. मात्र, शिवसेना अद्याप ‘यूपीए’मध्ये सहभागी झालेली नाही.